

Operation Sindoor
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मध्यरात्री हल्ला केला. हे ऑपरेशन सुरू केल्यानंतर काही तासांतच, चीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थिरतेसाठी भूमिका घ्यावी. तसेच शांतता आणि संयम राखावा आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांचा सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध आहे. भारत आणि पाकिस्तान नेहमीच एकमेकांचे शेजारी आहेत आणि ते चीनचेही शेजारी देश आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता वाटत आहे. भारत आणि पाकिस्तान हे नेहमीच एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि राहतील. हे दोन्ही देश चीनचे शेजारी आहेत. दोन्ही देशांनी शांतता राखावी."
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे हे विधान पुढे आले आहे.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ही कारवाई २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली. पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.
संरक्षण मंत्रालयाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, "काही वेळापूर्वीच, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. ज्या ठिकाणांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला आणि ते निर्देशित करण्यात आले होते."
"आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेले नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि प्रत्यक्ष कारवाई करताना भारताने बराच संयम दाखवला आहे,"असेही त्यात नमूद केले आहे.