Online Gaming Death: मेरठ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन गेम खेळत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार गेम खेळताना त्याचा रक्तदाब अचानक वाढला आणि त्यानंतर त्याला डोकेदुखी व अस्वस्थता जाणवू लागली. काही वेळातच तो बेशुद्ध पडला.
मृत तरुणाची ओळख मोहम्मद कैफ अशी आहे. तो बराच काळ मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यात जास्त वेळ घालवत होता. घटनेच्या दिवशीही कानात इअरफोन लावून तो मोबाईलवर गेम खेळत होता. अचानक डोकं जोरात दुखू लागल्यानंतर तो जमिनीवर कोसळला.
कुटुंबीयांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे दोन दिवस उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांना प्रयत्न करुनही जीव वाचवता आला नाही.
रुग्णालयात दाखल करताना त्याचा रक्तदाब 300 च्या पुढे गेला होता, ही अत्यंत धोकादायक पातळी आहे. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण मेंदूत रक्तस्राव (ब्रेन हेमरेज) असल्याचं सांगितलं आहे. नातेवाईकांचं म्हणणं आहे की कैफला गेमिंगची इतकी सवय लागली आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना नव्हती. परिसरातील नागरिकांच्या मते तो अनेकदा तासन्तास मोबाइलवर गेम खेळत बसलेला दिसायचा.
डॉक्टरांचा इशारा आहे की सतत स्क्रीनकडे पाहणं, ताणतणाव, झोपेचा अभाव यामुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ऑनलाइन गेमिंगचं व्यसन वाढत असताना पालकांनी आणि युवकांनी वेळेवर सावध होणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.