Rajnath Singh Targets Rahul Gandhi Over Government Row: काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनावरून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी लढा द्यायचा नसून, देशातील सरकार पाडायचे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
बांगलादेशच्या धर्तीवर भारतात सत्ताबदल घडवून आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला. लोकशाही संस्थांवर प्रश्न उपस्थित करून देशात अस्थिरता निर्माण करणे, हाच विरोधकांचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीमध्ये काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टीकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. तरुणांना आंदोलनाच्या माध्यमातून अराजकतेच्या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह यांनी ‘रिजीम चेंज’ म्हणजेच सत्ताबदल या शब्दाचा उल्लेख केला. विरोधकांचे आंदोलन निवडणूक सुधारणांसाठी किंवा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी (SIR) नसल्याचा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, विरोधकांचा लढा ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातही नाही. देशातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठीही हे आंदोलन सुरू नाही. देशात अस्थिरता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.
राजकीय स्वार्थाला सत्य आणि देशहितापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते, तेव्हा लोकशाहीतील चर्चा तथ्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांवर आधारित होते, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, लोकशाहीच्या नावाखाली गोंधळ निर्माण करणे, घटनात्मक संस्थांवर प्रश्न उपस्थित करणे किंवा देशाच्या विकासात अडथळे आणणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या अलीकडील टिप्पणीचाही त्यांनी उल्लेख केला. विरोधकांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी न्यायालयाच्या टिप्पणीचा संदर्भ दिला.
राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या कार्यकाळातील निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी १९९३ मधील घटनांचा उल्लेख करत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी निवडणूक आयोगात दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी नवीन चावला यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार केली होती. नवीन चावला यांनी निवडणूक आयोगातील संवेदनशील माहिती काँग्रेस नेत्यांसोबत शेअर केल्याचा आरोप करण्यात आला होता, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
काँग्रेसने नवीन चावला यांना पाठिंबा दिला आणि पुढे त्यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली, असा दावाही त्यांनी केला. नवीन चावला हे नेहरू-गांधी कुटुंबाच्या जवळचे असल्यामुळे काँग्रेसने त्यांना वाचवले, असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ दिला.
राजीव गांधी यांची हत्या ही संपूर्ण देशासाठी दुःखद घटना होती. या घटनेमुळे केवळ काँग्रेसलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला दुःख झाले होते, असेही ते म्हणाले.
मात्र, या घटनेनंतर संपूर्ण देशातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यामागचे कारण काय होते, असा प्रश्न उपस्थित करत राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली.
६ ऑक्टोबरपासून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीतील विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या आंदोलनांतर्गत विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याची आणि भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची मागणी केली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी भेटण्यास नकार दिला.
दरम्यान, या मोर्चाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काही नेत्यांना नोटीस बजावली आहे. तसेच, SIR प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित याचिकांवर न्यायालयाने निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांकडून उत्तर मागितले आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.