Nithin Kamath  file photo
राष्ट्रीय

Nithin Kamath: "मी मोबाईलवर नेट बँकिंग वापरत नाही!" 'झिरोधा'चे नितीन कामथ यांनी सांगितलं धक्कादायक कारण

Zerodha चे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी भारतीय बँकांकडून मोबाईल सुरक्षेच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या अनावश्यक परवानग्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे.

मोहन कारंडे

बेंगळूर: स्टॉक ब्रोकिंग कंपनी 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी भारतीय बँकांकडून मोबाईल सुरक्षेच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या अनावश्यक परवानग्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. सायबर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आपण स्वतः स्मार्टफोनवर कोणत्याही बँकेचे 'इंटरनेट बँकिंग ॲप' वापरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे कामथ यांचा आक्षेप?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली भूमिका मांडताना कामथ म्हणाले की, "मी माझ्या फोनवर नेट बँकिंग ॲप्स वापरत नाही, कारण ही ॲप्स ज्या अनिवार्य परवानग्या मागतात, त्यांना कोणताही तार्किक आधार नसतो. सुरक्षेच्या नावाखाली बँकिंग ॲप्सना माझ्या एसएमएस, फोन कॉल्स आणि कॉन्टॅक्ट लिस्टचा एक्सेस कशासाठी हवा असतो?"

डिव्हाइसच्या अशा खासगी माहितीमध्ये ढवळाढवळ करणे हे जागतिक सायबर सुरक्षा मानकांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. कामथ यांनी सायबर सुरक्षेतील 'प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज' या महत्त्वाच्या तत्त्वाचा उल्लेख केला. या तत्त्वानुसार, कोणत्याही ॲप किंवा यंत्रणेला केवळ तेवढ्याच माहितीचा किंवा फिचर्सचा एक्सेस दिला पाहिजे, जो त्याचे मुख्य काम करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे. "आक्रमक परवानग्या न मागणे हाच जागतिक स्तरावर सायबर सुरक्षेचा बेंचमार्क आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

झेरोधाचे 'काइट' ॲप घेते शून्य परवानग्या

कामथ यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपनीने अनावश्यक परवानग्या न मागता तयार केलेल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी याची तुलना केली. ते म्हणाले की, झिरोधाचे 'काइट' हे ट्रेडिंग ॲप युजर्सकडून कोणत्याही अनावश्यक परवानग्या मागत नाही. हा एक जाणीवपूर्वक केलेला डिझाइनचा निर्णय आहे. "जे आपल्याला स्वतःला आवडत नाही, ते इतरांशी करू नका, या तत्त्वावर आमची कंपनी चालते. 'काइट' मोबाईलवर शून्य परवानग्या मागते आणि हेच आमच्यावर लाखो ग्राहक विश्वास ठेवण्याचे मोठे कारण आहे," असे त्यांनी सांगितले.

तसेच, सेबीच्या दोन-स्तरीय पडताळणी नियमांमुळे खासगी माहिती न घेताही सुरक्षित प्लॅटफॉर्म तयार करणे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT