राष्ट्रीय

Nari Shakti Vandan Bill debate | निशिकांत दुबेंकडून आदित्य ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, संसदेत सत्ताधारी विरोधक भिडले

Nari Shakti Vandan Bill debate | अरविंद सावंतांसह सुप्रिया सुळेंनी केली माफी मागण्‍याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Nari Shakti Vandan Bill debate

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेत गुरुवारी 'नारीशक्ती वंदन' विधेयकावर चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत बोलत असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन अत्यंत वैयक्तिक आणि आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे संसदेत चांगलाच गदारोळ झाला.

अरविंद सावंतांसह सुप्रिया सुळे आक्रमक

आक्षेपार्ह वक्तव्यानंतर खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत निशिकांत दुबे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. विरोधी पक्षातील इतरही खासदार आक्रमक झाले. हा आक्रमक पवित्रा पाहून अध्यक्षांनी दुबे यांचे विधान पटलावर येणार नाही, केवळ सावंत बोलले तेवढेच पटलावर येणार असल्याचे सांगितले.

दुबे असे बोलूच कसे शकतात?

संसदेत बोलताना मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा घेत अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकार काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चलाखी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आरोप केला. तर दुबे असे बोलूच कसे शकतात, मग आम्ही ज्यांची नावे एपस्टीन फाइल्समध्ये आली किंवा जे तडीपार होते त्यांची नावे घ्यायची का, असे प्रत्युत्तर सावंत यांनी दिले. यावेळी संसदेत चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

त्‍यांनी महिला संरक्षणाबद्दल बोलले पाहिजे

अरविंद सावंत म्हणाले की, अलीकडेच महिला अधिकाऱ्यांचे एक संमेलन दिल्लीत पार पडले. यामध्ये एका मुलाखतीत एका अतिशय चांगल्या महिला अधिकाऱ्याने राज्यातील एका मंत्र्यावर आरोप केला की, एका मंत्र्याने महिला अधिकाऱ्याला नाकारले आणि हे महिला आरक्षणाबद्दल आणि सन्मानाबद्दल बोलतात. यांनी महिला संरक्षणाबद्दल बोलले पाहिजे, असा टोलाही लगावला.

आरक्षण नसताना आम्ही मुंबईच्या महापौरपदावर महिलांना संधी दिली

सावंत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातून येतो, ज्या महाराष्ट्रात महिलांचा आदर केला जातो. महिला नेतृत्वाची फार मोठी परंपरा महाराष्ट्र राज्याला आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा यांचा वारसा महाराष्ट्राला आहे. महिला विधेयकाला आमचा पाठिंबा आहे. मात्र मतदारसंघ फेररचनेशी महिला आरक्षण जोडणाऱ्या घटनादुरुस्तीला आमचा विरोध आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध असल्याचे खोटे नरेटिव्ह पसरवतो आहे. पण आम्हाला त्यांना सांगायचे की खुल्या प्रवर्गातूनही मुंबई महापालिकेच्या महापौरपदी आम्ही महिलांना संधी दिली. यावेळी सावतांनी किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, शुभा राऊळ या मुंबईच्या माजी महापौरांचा नामोल्लेख केला.

दुबेंना भिडले सुप्रिया सुळे-अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी संसदेत भाषण करताना कुलदीप सेंगर, ब्रुजभूषण सिंग या नेत्यांचा उल्लेख करत त्यांच्यावर महिला शोषणाचे आरोप आहेत आणि हे भाजपवाले आम्हाला नारीशक्ती सांगणार का? असा प्रश्न उपस्थित केला आणि महाराष्ट्राला लाभलेल्या उत्तुंग महिला नेतृत्वाची यादीच वाचून दाखवली. दरम्यान, दुबे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन आरोप केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. खासदार अरविंद सावंत यांच्यासह सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, गौरव गोगोई, संजय दीना पाटील आदी खासदारांनी संसदेत चांगलाच गोंधळ घातला. निशिकांत दुबे असे बोलूच कसे शकतात? असे विचारत त्यांना माफी मागायला लावा, असा पवित्रा विरोधी पक्षाच्या खासदारांनी घेतला. यावेळी अध्यक्षांनी मध्यस्थी करत दुबे यांचे वक्तव्य पटलावर येणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांची समजूत काढली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी पुढील भाषण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT