Nitish Kumar son political entry
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांचा अधिकृत राजकारणातील प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राजकारणात पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच निशांत कुमार उद्या बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार, ज्यांनी मार्च महिन्यात जेडीयूमध्ये (JD-U) प्रवेश केला होता, ते गुरुवारी सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या २७ मंत्र्यांपैकी एक असू शकतात, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन राज्यसभेत गेल्यानंतर, १५ एप्रिल रोजी सम्राट चौधरी बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री बनले आणि आता ते आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत आहेत.
शपथ घेण्याची शक्यता असलेल्या २७ मंत्र्यांपैकी निशांत कुमार यांच्यासह १२ मंत्री जेडीयूचे आहेत. निशांत कुमार यांच्या समावेशाकडे राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात असून, हे पक्षांतर्गत एका पिढीबदलाचे संकेत मानले जात आहेत. विस्तारित मंत्रिमंडळात जेडीयूकडून श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेसी सिंग, मदन सहनी, जमा खान, सुनील कुमार, शीला मंडल, रत्नेश सदा, बुलो मंडल, भगवान सिंग कुशवाह, दामोदर रावत आणि निशांत कुमार यांसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय चौधरी यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
मंत्रिमंडळात एनडीएच्या (NDA) मित्रपक्षांमध्ये समतोल सत्तावाटपाचे सूत्र पाळले जाण्याची अपेक्षा आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सुमारे १२ जागा मिळू शकतात. लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) तीन, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) आणि राष्ट्रीय लोक जनता दल (RLJD) यांसारख्या लहान मित्रपक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे, दिलीप जयस्वाल, श्रेयसी सिंग, अरुण शंकर प्रसाद, लखिंद्र पासवान, राम कृपाल यादव आणि इतरांच्या नावांची मंत्रिमंडळात समावेशासाठी चर्चा सुरू आहे. मित्रपक्षांपैकी एलजेपी (RV) कडून संजय कुमार आणि संजय कुमार सिंग, तर जीतन राम मांझी यांच्या 'हम' कडून संतोष सुमन आणि आरएलजेडीकडून दीपक प्रकाश यांची नावे चर्चेत आहेत.
हा शपथविधी सोहळा पाटणा येथील गांधी मैदानावर पार पडण्याची शक्यता असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी ११:३० च्या सुमारास शहरात पोहोचणार आहेत. गृहमंत्री अमित शहा आधीच पाटण्यात दाखल झाले असून ते भाजपच्या मंत्र्यांची यादी अंतिम करण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यास केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.