प्रतिनिधिक छायाचित्र.  Pudhari
राष्ट्रीय

Nisarg Adhikari | CBSE पोर्टल हॅक करणाऱ्या १९ वर्षांच्या 'निसर्ग'च्‍या कौशल्याने तज्ज्ञ थक्क; IIT कानपूरमध्ये मिळाली नोकरी!

निसर्ग अधिकारीने निर्माण केलीय 'फाउंडिंग इंजिनिअर' म्हणून स्वतःची ओळख

पुढारी वृत्तसेवा

Nisarg Adhikari Ethical hacker : 'डिग्री की स्किल' (पदवी की कौशल्य) या विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा सुरू असतानाच १९ वर्षांचा निसर्ग अधिकारी (Nisarg Adhikari) सीबीएसई बोर्डाचे नवीन मार्किंग सिस्टम पोर्टल हॅक केल्यामुळे चर्चेत आला. आता थेट आयआयटी (IIT) मध्ये 'इंटेलिजेंस इंजिनिअर' या पदावर नोकरी मिळवून त्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोण आहे निसर्ग अधिकारी?

निसर्ग अधिकारी हा १९ वर्षांचा 'एथिकल हॅकर' (Ethical Hacker) आहे. नुकतीच त्‍याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. १२ वी पास होण्यापूर्वीच त्याने अनेक स्टार्टअप्ससोबत काम केले आहे. विविध ओपन-सोर्स सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्समध्ये सहभाग घेत त्याने 'फाउंडिंग इंजिनिअर' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याशिवाय, व्हेंचर कॅपिटलद्वारे अर्थसहाय्य मिळालेल्या मोठ्या स्टार्टअप्ससोबत काम करण्याचाही त्याला अनुभव आहे.

CBSE OSM पोर्टल केले होते हॅक

सीबीएसई ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम (CBSE OSM) वर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या दरम्यान, निसर्गने फेब्रुवारी महिन्यात हे पोर्टल हॅक केले. याची माहिती देऊन त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याने एक सविस्तर ब्लॉग लिहून स्टेप-बाय-स्टेप दावा केला होता की, सीबीएसईच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या. यानुसार शिक्षक म्हणून लॉगइन करणे अगदी सोपे होते. लॉगइन केल्यानंतर एखादा शिक्षक किंवा परीक्षक काम करू शकतो, त्या सर्व गोष्टींचे ॲक्सेस त्याला मिळाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे गुण बदलण्यापर्यंतच्या अधिकारांचा समावेश होता.

निसर्गसाठी 'तो' ब्लॉग ठरला आयआयटीचा प्रवेश मार्ग

निसर्गने वेबसाईटमधील या त्रुटींचा एक अहवाल तयार करून तो त्वरित 'इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-In) कडे पाठवला. ही संस्था भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत देशभरातील सायबर स्पेस सुरक्षित ठेवण्याचे आणि सायबर हल्ले व हॅकिंगसारख्या धोक्यांवर कारवाई करण्याचे काम करते. निसर्गने लिहिलेला हाच ब्लॉग त्याच्यासाठी आयआयटीचे दरवाजे उघडणारा ठरला.

हॅकिंगच्या तपासणीसाठी IIT ने केले निसर्गला पाचारण

सीबीएसई पोर्टल हॅक प्रकरणाची दखल घेत आयआयटी कानपूरच्या टीमने निसर्गला पाचारण केले. आयआयटीच्या तज्ज्ञांच्या टीमसोबत मिळून त्यांच्या स्वतःच्या आयटी सिस्टममधील सिक्युरिटी ब्रीच (सुरक्षा त्रुटी) शोधण्याची जबाबदारी होती. यादरम्यान आयआयटीचे तज्ज्ञ निसर्गच्या कौशल्यावर प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. तज्ज्ञांच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, निसर्गने काही अत्यंत महत्त्वाच्या त्रुटी शोधून काढल्या आहेत. संभाषणादरम्यान तो सायबर सुरक्षेबाबत किती फोकस आहे, हे टीमच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला ही सिस्टम सुधारण्यासाठी मदतीला घेण्यात आले आहे.

IIT कानपूरने 'इंटेलिजेंस इंजिनिअर' पदावर दिली नोकरी

१९ वर्षांच्या निसर्ग अधिकारीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरने 'इंटेलिजेंस इंजिनिअर' पदावर नोकरी दिली आहे. निसर्गने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली. त्याच्या प्रोफाईल अपडेटनुसार, आयआयटी कानपूरच्या 'टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब' (C3iHub) मध्ये त्याची ओपन-सोर्स इंटेलिजेंस (OSINT) आणि थ्रेट इंटेलिजेंस इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्लॉग वाचून संचालकांनी घेतला निर्णय

निसर्गने २२ मे रोजी प्रसिद्ध केलेला ब्लॉग वाचल्यानंतर आयआयटी कानपूरने त्याला बोलावले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयआयटी कानपूरचे संचालक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, "निसर्ग अधिकारीची आमच्या सायबर सिक्युरिटी टीममध्ये इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही याच टीमसाठी काही तरुण इंजिनिअर्सची भरती केली होती. तो आयआयटी कानपूरमधील सर्वात तरुण कर्मचारी आहे की नाही, हे मला निश्चित माहीत नाही; पण संस्थेने नियुक्त केलेल्या सर्वात तरुण इंजिनिअर्सपैकी तो नक्कीच एक आहे."

निसर्ग करणार आयआयटी कानपूरमधील संभाव्य सायबर धोके दूर

निसर्ग आता आयआयटी कानपूरमध्ये सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या स्त्रोतांकडून माहितीचे विश्लेषण करेल आणि वेबसाईट व ॲप्लिकेशन्समधील त्रुटी (Vulnerabilities) शोधून काढेल. यामुळे विविध संस्थांना संभाव्य सायबर धोके दूर करण्यास मदत होईल. त्याला संस्थेच्या सायबर-सिक्युरिटी टीममध्ये कंत्राटी पद्धतीने इंजिनिअर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कोणतीही औपचारिक पदवी नाही

विशेष म्हणजे, निसर्गने अद्याप कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला नाही. तसेच त्याच्याकडे कोणतीही पदवी नाही. तरीही त्याचे हे यश हेच सिद्ध करते की, येणाऱ्या काळात पदवीसोबतच कौशल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT