राष्ट्रीय

एनआयसीडीपी : राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांना भूखंडांचे वितरण

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास रोजगार निर्मितीला 'बूस्टर डोस' देण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय  मार्गिका विकास अभियानाने (एनआयसीडीपी) वेग धरला आहे. अभियानाअंतर्गत आतापर्यंत देशभरातील विविध प्रकल्पांसाठी ९७९ एकर भूखंडांसह २०१ भूखंड विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय औद्योगिक यूनिट्सला वितरित करण्यात आले असून यातून १७ हजार ५०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने व्यक्त केला आहे. या गुंतवणुकीमुळे २३ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. १२ कारखान्यांमध्ये उत्पादन अगोदर पासूनच सुरू झाले असून जवळपास ४० कंपन्या त्यांचे कारखाने उभारत असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

(एनआयसीडीपी) औद्योगिक, व्यापारी, निवासी, विविध संस्था आदींच्या उपयोगांसाठी ५ हजार ४०० एकरहून अधिक विकसित जागा ताबडतोब वितरण करण्यासाठी उपलब्ध आहे. औद्योगिक मार्गिका योजनेंतर्गत, जागावाटप करण्यात आलेल्या लहान व्यावसायिकांना ते प्रत्यक्ष व्यावसायिक उत्पादन सुरू करेपर्यंत, संपूर्ण सहाय्य केले जात आहे. सुरूवातीला केवळ ३ ते ४ भागात सुरू झालेले हे प्रकल्प आता १८ राज्यांपर्यंत विस्तारले आहेत, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

औद्योगिक मार्गिका, मालवाहू मार्गिका, संरक्षण मार्गिका, राष्ट्रीय औद्योगिक उत्पादन क्षेत्र, उत्पादन संलग्न प्रोत्साहन आधारित औद्योगिक क्षेत्र, पंतप्रधान मित्र पार्क, वैद्यकीय आणि औषध निर्मिती पार्क आणि लॉजीस्टिक पार्क अशा सगळ्या प्रकल्पांची माहिती गोळा करून त्यांना पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत समाविष्ट केले जाऊ शकते का? याची चाचपणी नीती आयोगाकडून केली जाणार असल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT