NIA
एनआयने खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ​​लांडा याच्या प्रमुख साथीदाराला अटक केली आहे. File Photo
राष्ट्रीय

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग लांडाच्या प्रमुख साथीदाराला अटक, NIA ची कारवाई

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी (१८ जुलै) घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्क प्रकरणात खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ​​लांडा (Lakhbir Singh Sandhu alias Landa) याच्या प्रमुख साथीदाराला अटक केली. याबाबतची माहिती NIA ने दिली आहे.

पंजाबमध्ये केली कारवाई

बलजीत सिंग उर्फ ​​राणा भाई उर्फ ​​बल्ली असे त्याचे नाव आहे. हा मूळचा मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील असून, त्याला गुरुवारी पंजाबमधून अटक करण्यात आली. तो पंजाबमधील लांडाच्या एजंटांना शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठा करत असल्याचे आढळून आले आहे. एनआयएच्या माहितीनुसार, या शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. ज्यात उद्योजक आणि इतरांकडून खंडणी वसूल करण्यात येत होती.

बलजीत सिंगने सट्टाला शस्त्रे पुरवली

गेल्या वर्षी १० जुलै रोजी एनआयएने या प्रकरणाची स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेत तपास सुरु केला होता. या प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले आहे की पंजाब आणि इतर ठिकाणी हिंसक कारवाया करून भारतात अस्थिर वातावरण तयार करण्याचा खलिस्थानी दहशतवाद्यांचा कट आहे. विविध प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या मोठ्या कटाचा एक भाग म्हणून बलजीत सिंगने सट्टा याला शस्त्रे पुरवली होती.

"लांडा आणि सट्टा हे दोघेही भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातून सुत्रे हलवतात," असे एनआयएने म्हटले आहे, खलिस्तानी दहशतवादी संघटनांवर कारवाईचा एक भाग म्हणून त्यांचा तपास सुरू आहे.

भारताविरुद्ध कट

कॅनडा स्थित गँगस्टर लखबीर सिंग लांडा याला गृह मंत्रालयाने याआधी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. ३३ वर्षीय लखबीर सिंग लांडा हा प्रतिबंधित खलिस्तानी गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा (BKI) सदस्य आहे. त्याचा २०२१ मधील मोहाली येथील पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावरील रॉकेट हल्ल्याच्या कटात सहभाग होता. डिसेंबर २०२२ मध्ये तरन तारनमधील सरहाली पोलिस स्थानकावर झालेल्या आरपीजी हल्ल्यासह इतर दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा हात आहे. हा मूळचा पंजाबचा असून त्याचे गेल्या काही वर्षांपासून कॅनडात वास्तव्य आहे. भारताविरुद्ध कट रचण्यात त्यांचा सहभाग आहे. (Lakhbir Singh Landa)

कोण आहे लखबीर सिंग लांडा?

गृह मंत्रालयाने याआधी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 'लखबीर सिंग उर्फ लांडा हा सध्या एडमोंटन, अल्बर्टा, कॅनडा येथे राहतो. तो बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित दहशतवादी आहे. लांडाचा रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. दहशतवादी लखबीर सिंग लांडा याचा कॅनडा स्थित खलिस्तानी समर्थक संघटनेशी (पीकेई) जवळचा संबंध आहे. ज्याच्याशी मृत खलिस्तान टायगर फोर्स (KTF) चा दहशतवादी हरदीप सिंग निज्जर आणि शीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनदेखील जोडला गेला होता. (Lakhbir Singh Landa)

टार्गेट किलिंग, देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग

पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांसाठी सीमेपलीकडून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइस (आयईडी), शस्त्रे, अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके अशा विविध मॉड्यूल्सच्या पुरवठ्यात त्याचा सहभाग आहे. लांडाचा दहशतवादी मॉड्यूल, खंडणी, खून, आयईडी, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी आणि पंजाब आणि देशाच्या इतर भागांमध्ये दहशतवादी कारवांयासाठी पैशाचा वापर यासारख्या विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तो आरोपी आहे. याशिवाय दहशतवादी लांडाचा भारताच्या विविध भागात टार्गेट किलिंग, खंडणी व इतर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे.

SCROLL FOR NEXT