Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: "बाबा, मला घरी न्या, हे लोक मारून टाकतील" फोनवर नवविवाहित लेक ढसाढसा रडली; पण वडील पोहोचण्यापूर्वीच खेळ संपला

वडिलांकडे मदतीची याचना करणाऱ्या एका १९ वर्षीय नवविवाहितेचा काही तासांतच संशयास्पद मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Crime News newlywed teen death UP

मेरठ: "बाबा, मला घरी घेऊन जा, हे लोक मला मारून टाकतील," असा आर्त टाहो फोडत वडिलांकडे मदतीची याचना करणाऱ्या एका १९ वर्षीय नवविवाहितेचा काही तासांतच संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात मंगळवारी रात्री घडली. बागडपूर चोईया येथे सासरच्या घरात या तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पुष्पेंद्री देवी असे मृत तरुणीचे नाव असून, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

३ महिन्यांपूर्वी लग्न, १० लाखांच्या हुंड्यासाठी छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पेंद्री हिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी १३ फेब्रुवारी रोजी गजरौला परिसरातील खुमावली येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी ओमपाल याच्याशी झाला होता. पुष्पेंद्रीचे वडील बलबीर सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीच्या लग्नात त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे हुंडा आणि मानपान केला होता. मात्र, तरीही सासरचे लोक समाधानी नव्हते. लग्न झाल्यापासूनच आणखी १० लाख रुपयांची मागणी करत होते. यावरून त्यांनी पुष्पेंद्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता.

Crime News

वडिलांना शेवटचा फोन केला अन् म्हणाली...

मंगळवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास पुष्पेंद्रीने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत वडिलांना फोन केला होता. त्यांनी सांगितले की, "ती फोनवर मोठ्याने रडत होती आणि मला लवकर घरी घेऊन जा म्हणून गयावया करत होती. 'बाबा, हे लोक मला मारून टाकतील,' असे ती सांगत होती. मी तिची समजूत काढली आणि मी घ्यायला येतो असे सांगितले. पण मी तिथे पोहोचण्यापूर्वीच ती या जगातून निघून गेली होती. आमचे हे शेवटचे बोलणे ठरेल, अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती."

सासरच्यांनी आधी पुष्पेंद्रीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली आणि नंतर हा आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी तिचा मृतदेह छताला टांगला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल; आरोपी फरार

पोलिसांनी सांगितले की, पुष्पेंद्रीचे पती ओमपाल, सासरे राजेंद्र, सासू इंद्रावती यांच्यासह अन्य दोन नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तिच्या गळ्यावर फासाच्या खुणा आढळून आल्या आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या सर्व आरोपी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT