Netherlands returns Chola copper plates file photo
राष्ट्रीय

३० किलो वजन, २१ तांब्याच्या पट्ट्या... नेदरलँड्सने १००० वर्षे जुने 'चोलकालीन' ताम्रपट भारताला परत केले; काय आहे इतिहास?

Netherlands returns Chola copper plates: नेदरलँड्स सरकारने ११ व्या शतकातील चोल राजवंशाचे ताम्रपट भारताला परत केले.

मोहन कारंडे

Netherlands returns Chola copper plates

नवी दिल्ली: नेदरलँड्स सरकारने ११ व्या शतकातील चोल राजवंशाचे ताम्रपट भारताला परत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या विशेष सोहळ्यामुळे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील द्विपक्षीय आणि सांस्कृतिक संबंधांना नवी बळकटी मिळाली आहे. पंतप्रधान मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून, संयुक्त अरब अमिरातीचा दौरा आटोपून ते शुक्रवारी नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यात ते स्वीडन, नॉर्वे आणि इटलीलाही भेट देणार आहेत.

२०१२ पासूनचे प्रयत्न यशस्वी; 'लायडन प्लेट्स' मायदेशी परत

भारताबाहेर असलेल्या तमिळ संस्कृतीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवजांपैकी एक म्हणून या ताम्रपटांकडे पाहिले जाते. 'अनाईमंगलम ताम्रपट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक ठेव्याला नेदरलँड्समध्ये 'लायडन प्लेट्स' म्हटले जाते. हे ताम्रपट भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार २०१२ पासून सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर आंतरशासकीय समितीच्या २४ व्या अधिवेशनात या ताम्रपटांवर भारताचाच मूळ हक्क असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांमधील सकारात्मक चर्चेअंती, पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे औचित्य साधून नेदरलँड्सने हे ताम्रपट भारताकडे सोपवले.

ताम्रपटांचे वैशिष्ट्य काय?

एकूण २१ ताम्रपटांचा हा संग्रह चोळ सम्राट 'राजराज चोळ (पहिले)' यांच्या काळातील आहे. या ताम्रपटांचे एकूण वजन सुमारे ३० किलोग्रॅम असून, ते चोळ रजवंशाची राजमुद्रा असलेल्या एका भव्य कांस्य कड्याने एकत्र बांधलेले आहेत. या ताम्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे यावर दोन भागांत मजकूर कोरण्यात आला आहे. यातील एक भाग संस्कृत भाषेत तर दुसरा भाग तमिळ भाषेत आहे.

महान हिंदू सम्राट राजराज चोळ (पहिले) यांनी एका बौद्ध विहाराला दिलेल्या महसूल अनुदानाचा उल्लेख या ताम्रपटांवर आहे. हा तत्कालीन धार्मिक सलोख्याचा एक उत्तम ऐतिहासिक पुरावा मानला जातो. सम्राट राजराज चोळ यांनी सुरुवातीला हे अनुदान देण्याचे तोंडी आदेश दिले होते, ज्याची नोंद ताडपत्रांवर करण्यात आली होती. परंतु, हा इतिहास कायमस्वरूपी जतन व्हावा म्हणून त्यांचे सुपुत्र 'राजेंद्र चोळ (पहिले)' यांनी हा सर्व मजकूर तांब्याच्या पट्ट्यांवर कोरून घेतला. या ताम्रपटांना जोडणाऱ्या कड्यावर राजेंद्र चोळ यांचीच राजमुद्रा आहे.

ताम्रपट नेदरलँड्समध्ये कसे पोहोचले?

१७०० च्या दशकात ताम्रपटात उल्लेख असलेले 'नागापट्टिनम' हे शहर डच (नेदरलँड्स) सरकारच्या नियंत्रणाखाली होते. त्या काळात ख्रिश्चन मिशनरीचा भाग म्हणून भारतात आलेले 'फ्लोरेन्टियस कॅम्पर' यांनी हे मौल्यवान ताम्रपट नेदरलँड्सला नेले होते. तेव्हापासून हा ऐतिहासिक ठेवा भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते, ज्याला आता तब्बल ३०० वर्षांनंतर यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT