NEET UG 2026 Paper Leak :
जयपूर : NEET UG 2026 पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या मागे असलेल्या कथित नेटवर्कचे नवे तपशील तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. या पेपर लीकमुळे अखेर भारताची सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करावी लागली असून, याचा फटका २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे.
एका रिपोर्टनुसार, सीबीआय तपासादरम्यान, आरोपी कुटुंबातील सदस्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड आता समोर आले आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या एका गुणपत्रिकेनुसार, मुख्य आरोपी दिनेश बिवल याचा मुलगा ऋषी बिवल याने राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (RBSE) २०२६ च्या उच्च माध्यमिक परीक्षेत (१२वी) 'ग्रेस मार्क्स'च्या (सवलतीचे गुण) मदतीने द्वितीय श्रेणी (Second Division) मिळवली आहे.
गुणपत्रिकेनुसार, ऋषीला ५०० पैकी २५४ गुण मिळाले असून त्याची एकूण टक्केवारी ५०.८०% आहे. विषयवार गुणांवर नजर टाकल्यास त्याला हिंदीत ३२, इंग्रजीत ५१, भौतिकशास्त्रात ५१, रसायनशास्त्रात ५८ आणि जीवशास्त्रात ६२ गुण मिळाले आहेत. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये त्याचे थिअरीचे (लेखी) गुण अत्यंत कमी होते.
तपास अधिकार्यांच्या मते, ऋषी या वर्षी NEET UG 2026 च्या परीक्षेला बसला होता आणि त्याचा वडील दिनेश याने त्याचासाठी आरोपी यश यादव याच्याकडून कथितरित्या लीक झालेली प्रश्नपत्रिका विकत घेतली होती. NEET UG 2026 पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आता राजस्थानमधील जयपूर ग्रामीण जिल्ह्यातील जमवा रामगढ येथील एका संपूर्ण कुटुंबावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. तपासादरम्यान यंत्रणांना असे आढळून आले की, या कुटुंबातील चार नव्हे तर तब्बल पाच सदस्यांनी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला होता. यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून हे मोठे संघटित पेपर लीक नेटवर्क कार्यरत होते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
CBI च्या माहितीनुसार, दिनेशची मुलगी गुंजन हिने NEET परीक्षा उत्तीर्ण केली असून तिला बनारस मेडिकल कॉलेजमध्ये जागा मिळाली आहे. तिच्याशिवाय दिनेश आणि मांगीलाल यांचा मोठा भाऊ घनश्याम याच्या मुली पलक आणि सोनिया यांनीही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सोनिया सध्या मुंबईतील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. दुसरीकडे, मांगीलालची मुलगी प्रकृती दौसा मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे, तर विकास याने सवाई माधोपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे.
तपासातून असे संकेत मिळत आहेत की, हे कथित नेटवर्क गेल्या अनेक वर्षांपासून पद्धतशीरपणे काम करत असावे. तपासानुसार, या प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रातील अहिल्याबाई नगर (अहमदनगर) येथील धनंजयपासून सुरू होतात आणि नाशिकमधील शुभम खैरनारपर्यंत पोहोचतात. तिथून हे कनेक्शन हरियाणातील यश यादवपर्यंत जाते. यश यादव, ज्याने यापूर्वी राजस्थानच्या सीकरमध्ये NEET ची तयारी केली होती, तो कथितरित्या विकासच्या संपर्कात आला होता. यातूनच दिनेश आणि मांगीलाल या नेटवर्कशी जोडले गेले, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
CBI ला मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुमारास यशने विकास आणि मांगीलाल यांना NEET ची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर, दिनेशने आपला मुलगा ऋषी आणि पुतण्या अमन यांच्यासाठी पेपर मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजली होती. तपास अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लीक झालेला पेपर मोठ्या प्रमाणावर पुढे पसरवण्यात आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. ऋषीवर राकेश मंदावरियाच्या माध्यमातून हा लीक झालेला पेपर इतरत्र वाटल्याचा आरोप आहे.
CBI ला असेही आढळून आले आहे की, हा लीक झालेला पेपर जमवा रामगढमधील इतर काही विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचला होता. मात्र, अधिकारी सध्या पेपर मिळवणाऱ्या वैयक्तिक विद्यार्थ्यांपेक्षा, हा पेपर वाहतूक आणि वितरित करणाऱ्या आंतरराज्य नेटवर्कवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.सध्या सीकरच्या राकेश मंदावरियाची कसून चौकशी केली जात असून, त्याला या प्रकरणात सरकारी साक्षीदार केले जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) CBI कडे सोपवलेल्या जवळपास दोन डझन विद्यार्थी आणि पालकांपैकी बहुतांश जणांची चौकशी करून सुटका करण्यात आली आहे. मात्र, तपास पुढे सरकेल तशी गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते, असे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.