

NEET Paper leak: नीटचा पेपर लीक झाल्याची सर्वात आधी माहिती देणाऱ्या कोचिंग क्लासच्या शिक्षकाने एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी आपण सर्वात आधी पोलीसांकडे गेलो होतो. मात्र तिथं त्यांनी एफआयआर दाखल करून घेतली नाही. त्यानंतर मी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला चिठ्ठी लिहिली होती असा दावा केला आहे. ही घटना ३ मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थानमधील एक प्रसिद्ध कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला हाताने लिहिलेली नीटची संभाव्य प्रश्नपत्रिका मिळाली होती. ही प्रश्नपत्रिका त्यांच्या घरमालकाकडून त्यांना मिळाली होती. त्यांनी हे खरं आहे का असं विचारलं होतं. घरमालकाला ही प्रश्नपत्रिका करेळममधील त्यांच्या मुलाकडून मिळाली होती.
शिक्षकाने हा संभाव्य पेपर आणि प्रत्यक्ष नीटचा आलेला पेपर याची तपासणी केली. त्यावेळी त्याला दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये साधर्म्य असल्याचं जाणवलं. त्यावेळी त्या शिक्षकाने पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तिथं दखल घेतली गेली नाही म्हणून थेट NTA कडे तक्रार केल्याचा दावा कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने केला आहे.
दरम्यान, 'पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे (तक्रारदार शिक्षक) म्हणणे ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी एक कोरा पेपर देत लिखित तक्रार द्या असं सांगितलं. मात्र ते तिथून उठून गेले.' असा दावा पोलीस ठाण्यातील एसएचओ यांनी केला आहे.
इंडियन एक्स्पेसला उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'ज्यावेळी या शिक्षकाला त्याच्या कोचिंग सेंटरचा पाठिंबा मिळाला त्यानंतर त्याने राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) ला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला.'
शिक्षकाने NTA केलेल्या तक्रारीत, एक पीडीएफ फाईल आहे ज्यात जवळपास ६० पाने आणि हँड रिटन डॉक्युमेंट आहे. त्यात ९० प्रश्न केमेस्ट्रीचे आणि ७ ते ८ पाने बायोलॉजीचे प्रश्न आहेत.
तक्रारदाराने, 'या प्रकरणाचा स्वतंत्र एजन्सीद्वारे तपास होण्याची गरज आहे. सद्याची परिस्थिती पाहता यात प्रश्नपत्रिकेचा बेकायदेशीर अॅक्सेस, वितरण आणि प्रसारण या गोष्टी समाविष्ट आहेत. त्यामुळं मी या कथित पेपर लीक प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी नम्र विनंती करतो.' अशी तक्रार केली आहे.
तक्रारदाराने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, 'मी माझा मोबाईल देखील फॉरेन्सिक तपासासाठी जमा करण्यास तयार होतो. मला नीट परीक्षेचे महत्व आणि गांभिर्य दोन्ही माहिती आहे. याचा परिणाम अनेक विद्यार्थ्यांच्या थेट आयुष्यावर पडणार आहे याची देखील जाणव होती.'