Bodyguard' Satellites : अंतराळात असलेल्या आपल्या उपग्रहांना बाह्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी भारत आता एका नव्या योजनेवर काम करत आहे. या योजनेचा उद्देश शत्रू देशांच्या उपग्रहांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना रोखणे आहे. अलीकडेच एका परदेशी उपग्रहाने भारतीय उपग्रहाजवळ केलेल्या संशयास्पद हालचालींमुळे या योजनेला वेग आला आहे. दरम्यान, इस्रो आणि अंतराळ विभागाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकार असे ' बॉडीगार्ड' उपग्रह तयार करण्याचा मानस व्यक्त केला आहे. हे बॉडीगार्ड उपग्रह भारतीय उपग्रहांच्या आसपास राहून त्यांचे संरक्षण करतील. कोणत्याही संशयास्पद हालचाली ओळखतील.सूत्रांनी म्हटलं आहे की, मागील वर्षी एका शेजारील देशाचा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) एका उपग्रहाच्या केवळ एक किलोमीटर जवळून गेला. हा इस्रोचा उपग्रह पृथ्वीवर निरीक्षण आणि मॅपिंगसारखी कामे करत होता, ज्याचा उपयोग संरक्षण क्षेत्रातही होतो. या उपग्रहांची टक्कर झाली नाही, परंतु तज्ज्ञांच्या मते, हा निव्वळ योगायोग नव्हता, तर एका प्रकारचा शक्ती प्रदर्शन होता. म्हणजेच, तो दुसरा देश अंतराळात आपली ताकद दाखवू इच्छित होता. या घटनेने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंतराळात असलेल्या धोक्याला अधोरेखित केले आहे.
उपग्रह सुरक्षा प्रकल्पांतर्गत भारत अंतराळात आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. यासाठी सुमारे 27 हजार कोटी रुपये खर्च करून 50 पाळत उपग्रह पाठविण्याचे नियोजन आहे. पहिला बॉडीगार्ड उपग्रह पुढील वर्षी प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. भारताचे शेजारील चीन आणि पाकिस्तानसोबत दीर्घकाळापासून सीमावाद आहेत आणि या देशांच्या अंतराळ क्षमता वेगवेगळ्या स्तरांवर आहेत. पाकिस्तानकडे फक्त आठ उपग्रह आहेत, तर भारताकडे शंभरहून अधिक उपग्रह आहेत. चीन या बाबतीत सर्वात पुढे आहे, त्यांच्याकडे 930 पेक्षा जास्त उपग्रह आहेत.
भारत आणि अमेरिका दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अंतराळात धोकादायक पद्धतीने आपले अस्तित्व वाढवत आहे. जूनमध्ये एका सेमिनारमध्ये एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनीही सांगितले होते की, चीनच्या अंतराळ हालचाली केवळ वेगवानच नाही, तर अत्यंत प्रगत देखील आहेत.
भारत सरकार आता स्टार्टअप्सच्या मदतीने असे उपाय शोधत आहे, जे धोके वेळेत ओळखू शकतील. लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग (LIDAR) तंत्रज्ञानाचे उपग्रह सोडण्याची एक कल्पना आहे. हे उपग्रह कोणत्याही संभाव्य धोक्याची लवकर ओळख पटवतील, जेणेकरून जमिनीवर बसलेले तंत्रज्ञ वेळेत त्या उपग्रहाला दुसऱ्या दिशेने पाठवू शकतील.
या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मर्यादित लष्करी संघर्षादरम्यान इस्रोने मोठी भूमिका बजावली होती. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी 9 सप्टेंबर रोजी सांगितले की, त्यावेळी 400 पेक्षा जास्त वैज्ञानिक रात्रंदिवस काम करत होते, जेणेकरून पृथ्वीवर लक्ष ठेवणारे आणि संवादाशी संबंधित उपग्रह पूर्ण क्षमतेने काम करू शकतील.