

न्यूयॉर्क : अंतराळात वेगवेगळ्या आकृत्या दिसतात. दुर्बिणीच्या मदतीने शास्त्रज्ञ हे फोटो घेतात. बहुतांश ‘नेब्युला’ हे वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या तसेच मानवी अवयवांच्या आकारातही दिसून येत असतात. या द़ृश्यांचे आकार पाहिल्यास आश्चर्यकारक वाटतात. असेच एक द़ृश्य शास्त्रज्ञांनी कॅमेर्यात कैद केले आहे. या चित्राला लोक ‘देवाचा हात’ म्हणत आहेत. देवाच्या वरदहस्तासारखे म्हणजेच वर देणार्या हातासारखे हे द़ृश्य नेमके कसे काय आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या.
महाकाय हातासारखा हा आकार खरं तर एक नेब्युला आहे, असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तो वायू आणि धुळीचा प्रचंड ढग असतो. पल्सर म्हणजेच वेगाने फिरणार्या न्यूट्रॉन तार्यामुळे त्याची निर्मिती झाल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. हाताच्या आकाराचा हा आकार 12 मैल रुंद आणि अतिशय शक्तिशाली असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्याच्या फिरण्याचा वेगही खूप वेगवान असतो. हे एका सेकंदात सुमारे 7 वेळा फिरते. त्याचबरोबर त्याचे चुंबकीय क्षेत्रही पृथ्वीपेक्षा 15 ट्रिलियन पट जास्त आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, त्याच्या मध्यभागी असलेल्या पल्सरचे नाव B1509-58 आहे. पल्सरचा वेग आणि शक्तिशाली चुंबकीय शक्ती यामुळे उत्सर्जित होणारे कण हवेत जमा झाले, त्यानंतर तो हातासारखा आकार म्हणजेच नेब्युला बनला आहे. शास्त्रज्ञांनी दोन प्रकारची माहिती गोळा केली. मग, हे चित्र स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलियन टेलिस्कोपच्या मदतीने रेडिओ लहरी आणि नासाच्या चंद्रा X- ray ऑब्झर्वेटरी X- ray किरणांचे एकत्रीकरण करण्यात आले. ज्यानंतर ते हातासारखे दिसणारे चित्र बनवले जाते. रेडिओ लहरी लाल रंगात ओळखल्या जातात, तर X- ray किरण निळा, केशरी आणि पिवळा असतो. ज्या ठिकाणी ते जमा होतात, तिथे त्यांचा रंग जांभळा होतो.