नवी दिल्ली: नाशिकमधील महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणासंदर्भातील एका बातमीची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेतील ३० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांचा संबंधित विभागप्रमुख आणि इतरांकडून लैंगिक, मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, विशाखा समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना आरोपींविरुद्ध तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सदर चौकशीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि पॉश कायद्यासह आयपीसी अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करावी, पीडितांना आवश्यक संरक्षण आणि आधार द्यावा, असेही निर्देश दिले आहेत. सोबतच ३ दिवसांच्या आत त्यांच्या कारवाईचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे, असेही सांगितले आहे.