नवी दिल्ली : ‘जनजातीय गौरव दिवस’ कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आदिवासी कलाकारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी.  pudhari photo
राष्ट्रीय

Narendra Modi : नक्षलवादावर आधीची सरकारे बघ्यांच्या भूमिकेत

सर्वाधिक झळ आदिवासींना : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; गडचिरोलीतून नक्षलवादमुक्त भारताचा संदेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नक्षलवाद आणि माओवादी दहशतीच्या धोक्यातून देशाला पूर्णपणे मुक्त करणे, ही भारताची मोठी उपलब्धी आहे. नक्षलवादामुळे सर्वाधिक नुकसान आदिवासी समाजाचे झाले. गडचिरोलीसह देशातील अनेक आदिवासीबहुल भागांना या समस्येचा मोठा फटका बसला. मात्र आधीच्या सरकारांनी बघ्यांची भूमिका घेतली, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केला.

बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित ‘जनजातीय गौरव दिवस’ कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हर्च्युअली) संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आयोजित या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यावेळी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन करण्यात आले.

मोदी म्हणाले, आता नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यामुळे या भागांतील माता-भगिनी स्वतःला सुरक्षित समजू लागल्या आहेत. ज्या तरुणांचे बालपण नक्षलवादामुळे हिरावले गेले, त्यांना आता शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळत आहेत. देशाच्या वाटचालीतील दोन ऐतिहासिक उपलब्धींचा उल्लेख करताना मोदी यांनी सुमारे ५० कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर देशाला नक्षलवाद आणि माओवादी दहशतीच्या धोक्यातून मुक्त करण्याची उपलब्धीही त्यांनी अधोरेखित केली. या दोन्ही उपलब्धी आदिवासी बांधवांच्या जीवनाशी थेट संबंधित असल्याचे ते म्हणाले.

मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विशेष उल्लेख केला. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर आदिवासी समाजातील कन्या विराजमान असल्याचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे ते म्हणाले.

पीएम-जनमनसाठी एक लाख कोटींहून अधिक निधी

आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पीएम-जनमन योजना आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानासाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आल्याचे मोदी म्हणाले.

गरिबांसाठी चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधली आहेत. अनेक दशके अंधारात असलेल्या १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचविण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने मागे राहिलेल्या भागांच्या प्रगतीसाठी देशभरातील १०० हून अधिक आकांक्षी जिल्हे आणि ५०० हून अधिक आकांक्षी ब्लॉकमध्ये विशेष अभियान राबविण्यात येत आहे. यातील अनेक भाग आदिवासीबहुल आहेत. या योजनांमुळे त्यांच्यात पुढे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मोदी यांनी नमूद केले.

गडचिरोली ही शौर्य परंपरेची भूमी

गडचिरोलीचा उल्लेख समृद्ध आदिवासी संस्कृती आणि शौर्य परंपरेची भूमी असा करत मोदी यांनी राघोजी भांगरे, भागोजी नाईक आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या शौर्यगाथांना अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांचा उलगुलान आणि त्यांनी अल्पवयात केलेला संघर्ष आजही कोट्यवधी देशवासीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे मोदी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT