

मुंबई : कलिना परिसरातील १३५ वर्षांहून अधिक जुन्या वटवृक्षासह प्राचीन दगडांचे संवर्धन आणि परिसरातील जैवविविधता टिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठात ‘प्रकल्प प्राण’ या हरित वारसा संवर्धन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यापीठ परिसरातील हरित जागांचे संवर्धन, जुन्या वटवृक्षाचे जतन, प्राचीन दगडांचे संरक्षण आणि जैवविविधतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या पारंपरिक कला आणि कौशल्यांचे जतन करण्यावरही भर दिला जाणार आहे. वारली, गोंड, मधुबनी, सौरा आणि पिथोरा यांसारख्या आदिवासी चित्रशैलींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, निसर्ग आणि लोकजीवनाचा परिचय नव्या पिढीला करून दिला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि उपकुलसचिव अशोक घुले उपस्थित होते.
विद्यापीठ परिसरातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा ही संस्थेची महत्त्वाची संपत्ती आहे. १३५ वर्षांहून अधिक जुन्या वटवृक्षापासून प्राचीन दगडांपर्यंत प्रत्येक ठेव्यामध्ये इतिहास आणि सांस्कृतिक ओळख दडलेली आहे. हा वारसा जतन करणे ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचे कुलगुरू प्रा. कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
ओशियन नेटवर्क एक्स्प्रेसच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई मकाबोच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ बोरिवली आणि मुंबई विद्यापीठ यांच्या भागीदारीत हा उपक्रम साकारण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या कार्यक्रमात प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या बाटली श्रेडिंग मशीनचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.