Manoj Mukund Naravane Autobiography Controversy
माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आत्मचरित्रावरून सोमवारी (२ फेब्रुवारी) लोकसभेत मोठा गदारोळ झाला. या आत्मचरित्रातील काही मुद्द्यांचा आधार घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोपांची तोफ डागली. त्यांनी या पुस्तकावर आधारित एका लेखातील उतारे संसदेत वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गदारोळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. जाणून घेऊया अप्रकाशित 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात का सापडले आहे याविषयी....
लोकसभेत राहुल गांधी म्हणाले की, "मी येथे सादर करत असलेली माहिती लष्करप्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रामधून आहे. तुम्ही नीट ऐकावे अशी माझी इच्छा आहे; कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे तुम्हाला नक्की समजेल. हे चार चिनी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले होते तेव्हाची गोष्ट आहे; ते डोकलाममध्ये कड्यावर चढत होते. मी त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख असलेल्या एका लेखातून माहिती देतो."संरक्षण मंत्र्यांनी विचारले की, "आत्मचरित्र औपचारिकपणे प्रकाशित झाले आहे का? ज्या पुस्तकात या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत ते प्रकाशित झाले आहे का? जर ते प्रकाशित झाले असेल तर ती माहिती द्या, जर ते प्रकाशित झाले नसेल तर त्यांचा संदर्भ देणे योग्य नाही," राजनाथ सिंह म्हणाले.सभापती बिर्ला यांनी नमूद केले की, विरोधक म्हणून राहुल गांधी संसदीय प्रक्रियेचे चांगले जाणकार आहेत. राहुल गांधींनी आपण देत असलेला संदर्भ शंभर टक्के खरा असल्याचा दावा केला. संरक्षणमंत्र्यांनी गांधींवर वारंवार पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी दबाव आणला. "ते सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत," असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. तसेच सभागृहात असंबद्ध गोष्टींचा उल्लेख करू नये, असे आवाहनही केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. प्रचंड गदारोळामुळे अखेर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
मंगळवारी लोकसभा तहकूब झाल्यानंतर या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांना फक्त जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरील एका मासिकातील वृत्ताचा उल्लेख करायचा होता. नरवणे यांनी 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' हे आत्मचरित्र लिहिले आहे. या अप्रकाशित आत्मचरित्रावर 'द कॅरव्हॅन'ने अलीकडेच कव्हर स्टोरी केली आहे. हे पुस्तक पेंग्विन प्रकाशन संस्थेला प्रकाशित करायचे होते. ते सुमारे दीड वर्षांपासून संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्यास परवानगी नाही. यामध्ये लष्करप्रमुखांनी आपला दृष्टिकोन मांडला आहे. "सरकार लष्करप्रमुखांच्या दृष्टिकोनाला का घाबरते?" असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
नरवणे लष्करप्रमुख असताना पूर्व लडाखमधील गलवान येथे भारतीय आणि चिनी सैन्यात संघर्ष झाला. १५-१६ जून २०२० रोजी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यात चकमक झाली. यामध्ये एका कर्नलसह वीस भारतीय लष्करी जवान शहीद झाले. चिनी बाजूने झालेल्या नुकसानाची अधिकृतपणे कधीही माहिती देण्यात आली नाही. नरवणे यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने 'अग्निपथ' भरती योजना आणली होती. याला विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला होता. आता जनरल नरवणे यांच्या आत्मचरित्रात लष्करी कारवाया आणि सरकारच्या धोरणांशी संबंधित मजकूर आहे. त्यामुळेच त्याचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्याचे प्रकाशन लांबणीवर पडले, असे वृत्त आहे.
'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आत्मचरित्रात चीनसोबत वाढत्या तणावादरम्यान ३१ ऑगस्ट २०२० रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या त्यांच्या संवादाचे वर्णन केले आहे. "त्यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रश्नी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आता पूर्णपणे जबाबदारी माझ्यावर होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि काही मिनिटे शांत बसलो," असे नरवणे यांनी आठवणीत लिहिले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. तसेच पुस्तकाच्या मागील मुखपृष्ठावर माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी लिहिलेले एक छोटेसे वाक्य आहे, ज्यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते.
१९९९ च्या कारगिल युद्धाचे नेतृत्व करणारे जनरल व्ही. पी. मलिक यांनी या पुस्तकाबद्दल (किंवा मजकुराबद्दल) आपले मत मांडताना म्हटले आहे की, "हे लेखन भारतीय सैन्याच्या विविध जबाबदाऱ्या, त्यांचे कामकाज आणि सध्या सुरू असलेल्या चर्चांवर अतिशय जवळून आणि नेमका प्रकाश टाकते. विशेषतः गलवान खोऱ्यातील घटनेच्या आधी आणि नंतर लडाखमध्ये भारत-चीन दरम्यान जो संघर्ष झाला, त्याचे यामध्ये दिलेले सविस्तर वर्णन अतिशय माहितीपूर्ण आणि थरारक आहे. हे वाचन कोणत्याही वाचकाचा उत्साह नक्कीच वाढवणारे आहे."
"माझे आत्मचरित्र एक वर्षापेक्षा अधिक काळ पुनरावलोकनाखाली आहे. माझे काम पुस्तक लिहिणे आणि ते प्रकाशकांना देणे होते. प्रकाशकांनी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळवायची होती. त्यांनी ते त्यांना दिले. ते पुनरावलोकनाखाली आहे. गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून ते अजूनही पुनरावलोकनाखाली आहे. पण मला पुस्तक लिहिण्याचा आनंद झाला, चांगले किंवा वाईट. संरक्षण मंत्रालयाने जेव्हा त्यांना योग्य वाटेल तेव्हा परवानगी देणे हे त्यांचे काम आहे. याचा पाठपुरावा करणे माझे काम नाही. चेंडू प्रकाशकांच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या कोर्टात आहे," असे ऑक्टोबर २०२५ मध्ये जनरल नरवणे यांनी म्हटल्याचे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिले होते. आता जनरल नरवणे यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' मंजुरी प्रक्रियेत असले तरी, एका मासिकातील लेखाचा आधार घेत राहुल गांधी यांनी चीन धोरणाबाबत केंद्र सरकारवर हल्ला केल्याने हे पुस्तक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.