Nanda Devi Indian Gas Tanker Arrived: गेल्या अनेक दिवसांपासून हार्मुझ सामुद्रधुनी इराण अन् अमेरिका युद्धाचा नवा आखाडा झाली होती. त्यामुळं भारतातील अनेक तेल आणि गॅस वाहून नेणारे टँकर या भागात अडकून पडले होते. अखेर इराणने भारताचे गॅस आणि तेल वाहून नेणारे टँकर सुरक्षित जाऊ देण्याची हमी दिल्यानंतर भारताचे टँकर गुजरातमध्ये दाखल होत आहेत.
आज नंदा देवी हा दुसरा गॅस वाहून नेणारा टँकर गुजरातमध्ये दाखल झाला आहे. नंदा देवी हा भारतीय टँकर जवळपास ४६ हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन गुजरातमध्ये दाखल झाला आहे. यापूर्वी भारताचा एलपीजी टँकर शिवालिक देखील हार्मुझमधून सुरक्षित गुजरातमध्ये दाखल झाला होता.
नंदा देवी व्हेसलचे सीओ यांनी सांगितलं की भारतीय बंदर, जहाजे आणि जलमार्ग मंत्रालय आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी पुढाकार घेतला होता. याचबरोबर भारतीय नौदल आणि इराणच्या नौदलानं हार्मुझ सामुद्रधूनीमधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ती सहाय्यता केली.
इराणने अत्यंत महत्वाची असलेली हार्मुझ सामुद्रधूनी बंद पाडल्यानंतर जगाच्या ४० ते ५० टक्के तेल वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. इराण हार्मुझ मधून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर हल्ला करत आहे. याचबरोबर इराणने आखादी देशात अनेक मिसाईल आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत.
दरम्यान, मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार नंदा देवी ही एलपीजी गॅस वाहून नेणारी व्हेसल ठरल्याप्रमाणे कंडला पोर्टवर डॉक करण्यात आलेली नाही. त्याऐवजी ही व्हेसल वाडीनार येथील समुद्रातच थांबवण्यात आली आहे. तिथं या व्हेसलमधील एलपीजी दोन वेगवेगळ्या एमटी बीडब्ल्यु ब्रीझ आणि जग प्रताप या शीपमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. यानंतर या दोन्ही शीप त्वरित तमिळनाडूला पाठवण्यात येतील. हा निर्णय वाहतुकीमधला वेळ वाचवण्यासाठी घेतला आहे.
नंदा देवी सारखेच अजून २२ भारतीय व्हेसल हे पर्शिय गल्फमध्ये अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून व्यापारी जहाजांना सुरक्षा देऊन त्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
भारताची युएईमधून येणारी जग लाडकी व्हेसल ८१ हजार टन मुर्बन क्रुड ऑईल घेऊन येत आहे. तिने देखील भारताच्या दिशेने सुरक्षित प्रवास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.