नवी दिल्ली : आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी पुन्हा चर्चा केली जाणार आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. (Maharashtra Assembly Polls | Nana Patole )
मागील ३ दिवस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत. रविवारी होणारी छाननी समितीची बैठक आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी पार पडली. दरम्यान, विविध ठिकाणी काँग्रेस नेत्यांच्या बैठका झाल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याही निवासस्थानी एक बैठक पार पडली. या सर्व बैठकांच्या केंद्रस्थानी महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात काँग्रेस जिंकू शकणाऱ्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा ठोकल्याने काँग्रेस नाराज असल्याचे मानले जात होते. कुठल्याही परिस्थितीत विदर्भात जिंकू शकणाऱ्या जागा काँग्रेस सोडणार नाही, असा आक्रमक पवित्र आहे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील संबंध ताणले गेल्याच्या चर्चा होत्या. यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले. (Maharashtra Assembly Polls | Nana Patole )
शिवसेना आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्यात काहीही तथ्य नाही, भाजप जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. काँग्रेसकडूनही शिवसेना ठाकरे गटाबाबत कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वक नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बैठकीनंतर उद्या (मंगळवारी) उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाचे हिंदू प्रेम नकली आहे, नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि स्वयंभू विश्वगुरु असा प्रचार करण्यात आला. या ११ वर्षात शेतकऱ्यांचा आत्महत्यांमध्ये वाढ झाली त्यात जास्त हिंदूच होते. बेरोजगाराला कंटाळून तरुणांच्या आत्महत्या झाल्या त्यातही जास्त हिंदूच आहेत. भाजपाची सत्ता आली की हिंदूवर अन्याय केला जातो हे लपून राहिले नाही. भाजपाचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले असे जाहीरपणे सांगायचे आणि उमेदवारांच्या यादीत औरंगाबाद लिहायचे ही दुतोंडी भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची भूमिका आहे, असेही नाना पटोले म्हणाले. (Maharashtra Assembly Polls | Nana Patole )