Maharashtra Assembly Election : पुण्यात 'काँटे की टक्कर'

कसबा पेठ मतदारसंघ शहरात काँग्रेसचे वर्चस्व
 Pune
पुण्यात 'काँटे की टक्कर'File Photo
Published on
Updated on

हिरा सरवदे

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम झालेले नसले तरी इच्छुकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागा टिकवताना विद्यमान आमदारांची चांगलीच दमछाक होणार आहे. दुसरीकडे इच्छुकांना महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित, तिसरी आघाडी यांसारखे विविध पर्याय उपलब्ध असल्याने शहरातील सर्वच आठही मतदारसंघात 'काँटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.

पर्वती मतदारसंघ : पर्वती मतदार संघात भाजप

आमदार माधुरी मिसाळ यांनी तीन वेळा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. आता चौथ्यांदा त्या निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मागणी या दोघांनी पक्षाकडे केली आहे. महाविकास आघाडीत या जागेसाठी तीनही पक्षाची रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आश्विनी कदम, त्यांचे पती नितीन कदम आणि सचिन तावरे हे प्रमुख इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून माजी नगरसेवक आबा बागुल तर शिवसेनेकडून माजी नगरसेवक बाळा ओसवाल इच्छुक आहेत. ही जागा गत निवडणुकीत राष्ट्रवादीकडे होती. ती यावेळी काँग्रेस व शिवसेना मागत आहे. राष्ट्रवादीने जर ही जागा काँग्रेसला सोडली नाही, तर बागुल राष्ट्रवादीकडून आणि जर ही जागा शिवसेनेला सुटली तर कदम शिवसेनेकडून प्रयत्न करू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

कोथरूड मतदारसंघ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार असलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत येथून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक ७२ हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभेच्या प्रमुख इच्छुक प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिल्याने पुन्हा चंद्रकांत पाटील हेच उमेदवार असतील, असे मानले जाते. मात्र, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी निवडणुक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व माजी गटनेते पृथ्वीराज सुतार इच्छुक आहे. गत निवडणुकीच्या तुलने या निवडणुकीत पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान राहणार आहे. त्यामुळे कोथरूडची निवडणुक पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व प्रा. कुलकर्णी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल.

कसबा पेठ मतदारसंघ शहरात काँग्रेसचे वर्चस्व

असताना कसबा पेठ मतदारसंघ मात्र अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः धंगेकर उमेदवार असतानाही कसब्यात भाजपला १४ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे भाजपकडूनविधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या संघात काँग्रेसकडून विद्यमान मतदार आमदार धंगेकर यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे इच्छुक आहेत.

तर भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष धौरज घाटे, कुणाल टिळक इच्छुक आहेत. शिवाजी नगर मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला शिवाजी नगर मतदार संघ २०१४ पासून भाजपच्या ताब्यात आहे. विद्यमान आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्यासह माजी नगरसेवक सनी निम्हण आणि युवतीच्या माजी शहराध्यक्षा निवेदिता एकबोटे यांनी भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news