Drugs Issue (Pudhari File Photo)
राष्ट्रीय

Mysore Drug Cartel | म्हैसूर ड्रग्जची तस्करी देशभरासह विदेशातही

कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने उघडकीस आलेल्या म्हैसूर ड्रग्ज कारखान्याचा तपास अधिक तीव्र करणार्‍या कर्नाटक पोलिसांनी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅकेट असल्याचे म्हटले आहे. म्हैसूर शहराबाहेरील औषध कारखान्यात तयार होणारे अंमली पदार्थ केवळ बंगळूरसह कर्नाटकातील जिल्ह्यांमध्येच नव्हे, तर देशातील इतर राज्यांमध्येही पुरवले जात होते. तसेच परदेशातही पाठवले जात होते, असे या कारवाईत उघडकीस आले आहे.

गेल्या शनिवारी (दि. 26) रात्री एका औषध कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात महाराष्ट्र पोलिसांनी जप्त केलेल्या एमडीएमए औषधाची किंमत 381.96 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र पोलिसांनी म्हैसूर पोलिसांच्या सहकार्याने बन्नी मंटप रिंग रोडजवळील एका गॅरेजवर छापा टाकून 187 किलो ड्रग्ज जप्त केले. मुंबई-अंधेरी येथील फिरोज मौला शेख, गुजरातच्या सुरतमधील शेख आदिल आणि भरुच येथील सय्यद मेहफूज अली यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

घन आणि द्रव स्वरूपांसह एकूण 187.97 किलो एमडीएमए आढळून आले. यासोबतच, औषध निर्मितीसाठी वापरले जाणारे ओव्हन, हीट, कंटेनर आणि इतर उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी महिती पोलिसांनी दिली.

म्हैसूरमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होणारे हे औषध महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुरवले जात असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. विक्रीसाठी इतर लोकांची एक टीम होती. या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. टीममधील फक्त एकच तरुण शेडच्या शेजारी असलेल्या चहाच्या दुकानात येत असे आणि वारंवार चहा घेत असे. शेडमधून कोणीही बाहेर येत नव्हते. हवा आणि प्रकाश आत येऊ नये म्हणून शेड बंद होता. गॅरेजमध्ये किती लोक आहेत याची स्थानिकांना कल्पना नव्हती.

25 जुलैमध्ये सलीम इम्तियाज शेख उर्फ सलीम लंगडा (वय 45) याला वांद्रे पश्चिम पोलिस स्थानक हद्दीत अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान एमडीएमए ड्रग्ज म्हैसूर येथून पुरवले जात असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर एक विशेष पथक तयार करून म्हैसूरला पाठवण्यात आले. म्हैसूरमधील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने हा शोध लागला. 20 दिवसांपूर्वी महेशची जमीन 20 हजार रुपयांना भाड्याने घेतलेल्या अजमलने ती आरोपींना 2 लाख रुपयांना दिली होती. अजमललाही अटक करण्यात आली आहे.

या कारखान्यात तयार होणारे अंमली पदार्थ बंगळूर-म्हैसूर एक्सप्रेस वेवरून सहजपणे तस्करीसाठी नेले जात होते. महामार्गावर कोणीही वाहनांची तपासणी करत नसल्याने तस्कर या मार्गाने सहजपणे अंमली पदार्थांची वाहतूक करू शकत होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT