कर्नाटक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यात ठार झालेला वैद्यकीय विद्यार्थी नवीन ग्यानगौडर याचा मृतदेह सोमवारी (दि. 21) पहाटे 3 वाजता बंगळुरात आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी येथे झालेल्या आंतरराज्य जल तंटाप्रकरणी सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, गेल्या पंधरा दिवसांपासून केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय, युक्रेनमधील दूतावासाशी नियमित संपर्कात आहे. नवीनचा मृतदेह मिळाला असून तो सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे. सोमवारी (दि. 21) पहाटे बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मृतदेह आणण्यात येणार आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. हावेरी जिल्ह्यातील चळगेरी येथील विद्यार्थी नवीन हा युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत होता. रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात तो ठार झाला. या घटनेला दोन आठवडे उलटले आहेत. त्याचे पार्थिव आणण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
तीन दिवसांनी मृतदेह सापडला
बॉम्ब हल्ल्यात ठार झाल्यानंतर नवीनचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला होता. त्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली. मृतदेह युक्रेनमधील शवागारात ठेवण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून पार्थिव बंगळुरात आणण्यात येणार आहे. तेथून ते हावेरीतील चळगेरीला रवाना केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली.