नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात कोणतेही विघ्न येऊ नये, याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांना दिले.
मुंबई गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे. ४७१ कि.मी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यातील अनेक ठीकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या राज्य मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वा मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करावा, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांना दिले. त्यावर गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले.
मुंबई गोवा मार्गावर बांधण्यात येणाऱ्या ट्रामा हॉस्पिटलचे काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंतीही वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे यावेळी केली. मुंबई गोवा राज्य मार्गावरील भोस्ते घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परुशुराम घाट येथे भूस्खलन होते त्यामुळे या दोनही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा, असेही वायकर यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.