नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. भारतीय सैन्याने या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अकस्मात क्षेपणास्त्र हल्ले करून दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. सध्या जगभरात 'ऑपरेशन सिंदूर' चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, मुकेश अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी (७ मे) ट्रेड मार्क्स रजिस्ट्रीकडे 'ऑपरेशन सिंदूर'ची नोंदणी वर्क मार्क म्हणून करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
शिक्षण आणि मनोरंजन सेवांचा समावेश असलेल्या वर्ग ४१ अंतर्गत 'वस्तू आणि सेवा'साठी या शब्दाची नोंदणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्यासह मुकेश चेतराम अग्रवाल, ग्रुप कॅप्टन कमल सिंग ओबेरह (निवृत्त) आणि दिल्लीतील वकील आलोक कोठारी यांनीही या शब्दाच्या ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.
वाणिज्य मंत्रालयाच्या ट्रेडमार्क सर्च पोर्टलवरील माहितीनुसार, रिलायन्सने ७ मे रोजी वर्ग ४१ अंतर्गत ट्रेडमार्क म्हणून या शब्दाच्या नोंदणीसाठी अर्ज केला. चारही अर्जदारांनी नाइस क्लासिफिकेशन वर्ग ४१ अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज दाखल केला आहे. ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे.
शिक्षण आणि प्रशिक्षण सेवा
चित्रपट आणि मीडिया प्रोडक्शन
लाइव्ह परफॉर्मन्सेस आणि इव्हेंट्स
डिजिटल कंटेंट डिलिव्हरी आणि पब्लिशिंग
सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम
या श्रेणीचा वापर मुख्यतः ओटीटी प्लॅटफॉर्म्स, प्रोडक्शन हाऊसेस, ब्रॉडकास्टर आणि इव्हेंट कंपन्या करतात. ज्यावरून असे सूचित होते की 'ऑपरेशन सिंदूर' हे लवकरच एखाद्या चित्रपटाचे शीर्षक, वेब सिरीज अथवा डॉक्युमेंटरी ब्रँड बनू शकते.
दरम्यान, ट्रेडमार्क कायदा, १९९९ मधील तरतुदीनुसार, दिशाभूल करणारे, आक्षेपार्ह अथवा सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध असलेला ट्रेडमार्क नाकारण्याचा अधिकार रजिस्ट्रीला आहे. कलम ९ (२) आणि कलम ११ अंतर्गत, जर राष्ट्रीय संरक्षणाशी चुकीचा संबंध जोडला जात असल्याचे सूचित होत असेल अथवा त्यातून सार्वजनिक भावना दुखावल्या जात असतील तर रजिस्ट्राराकडून एखादा ट्रेडमार्क शब्द नाकारला जाऊ शकतो.
भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५ मिनिटांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि १ वाजून ३० मिनिटांनी भारतीय सैन्याने ‘जय हिंद’चे नारे देत हे ऑपरेशन यशस्वी झाल्याची आनंदवार्ता देशवासीयांना दिली. भारतीय सैन्याने अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.