राष्ट्रीय

MPSC Protest : 'एमपीएससी आंदोलन हायजॅक, CJP आणि काँग्रेसमध्ये अराजकतेची शर्यत'; मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका

आंदोलनस्थळी राजकीय कार्यकर्ते असले तरी तिथे विद्यार्थीही उपस्थित आहेत; त्यामुळे पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "महाराष्ट्रातील एमपीएससी आंदोलन हायजॅक झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांऐवजी तेथे राजकीय नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. तसेच सीजेपी आणि काँग्रेसमध्ये अराजकतेची शर्यत लागली आहे," अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील एमपीएससी आंदोलनाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. एमपीएससीच्या आंदोलनात मूळ विषय सोडून पूर्णपणे राजकीय मुद्दे मांडले जात आहेत. आंदोलनस्थळी राजकीय कार्यकर्ते असले तरी तिथे विद्यार्थीही उपस्थित आहेत; त्यामुळे पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाचही मागण्या मान्य केल्या आहेत

एमपीएससीच्या प्रश्नांबाबत १५ विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ सरकारकडे आले होते. या शिष्टमंडळाने पाच मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी एमपीएससी अध्यक्षांना पदावरून हटवावे किंवा त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करावी, ही प्रमुख मागणी होती. सरकारने चौकशी सुरू करण्यास सहमती दर्शविली. विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या मान्य करण्यात आल्या; मात्र त्यानंतरही पूर्णपणे बेकायदेशीर आंदोलन सुरू ठेवण्यात आले, असा आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे. ज्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा आधार घेत अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, त्या वेळी संबंधित व्यक्ती अध्यक्षपदावर नव्हती. तरीही सरकारने चौकशी सुरू केली आहे. चौकशीत काही गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांना हटविण्याचा प्रस्ताव सरकार देईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

‘विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर नको’

देशात यापूर्वी झालेल्या परीक्षांचे पुन्हा मूल्यमापन करण्याची पद्धत कुठेही अवलंबली गेलेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे हित आणि कारभारात पारदर्शकता राहावी यासाठी सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या, असा दावा फडणवीस यांनी केला. "विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा स्वतःची राजकीय पोळी भाजणे आणि राजकारण करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणे गैर आहे," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

‘देशात अराजकता निर्माण करण्याचा राहुल गांधी आणि मित्रपक्षांचा प्रयत्न’

राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. "संविधान कुचकामी आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संस्थाही कुचकामी आहेत, असे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे," असा दावा त्यांनी केला. संवैधानिक संस्थांना नाकारणे म्हणजे संविधानालाच नाकारणे होय, असे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. संबंधितांना लोकशाही आणि संविधान मान्य नसून देशात ‘अतिडावी’ राजवट आणण्याचा त्यांचा डाव असल्याचेही ते म्हणाले. संविधानाचा काही लोकांकडून दुरुपयोग केला जाऊ शकतो, असा इशारा स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.

‘अराजकतेची शर्यत लागली आहे’

सीजेपी आणि काँग्रेसच्या आंदोलनांवरही फडणवीस यांनी ताशेरे ओढले. दोन्ही पक्षांमध्ये अराजकतेची चढाओढ लागली असून ‘कोण आधी अराजकता निर्माण करतो, यासाठी दोन्ही पक्षांत जणू शर्यत लागली आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. सध्या विविध आंदोलनांना हिंसक वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "कुठे तरी हिंसा झाली पाहिजे, लाठीचार्ज झाला पाहिजे आणि वातावरण चिघळले पाहिजे, असा विरोधकांचा कुटील प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT