MP woman kills husband domestic violence case
भोपाळ : अनेक वर्षे सुरू असलेल्या कौटुंबिक छळाला कंटाळून एका २७ वर्षीय महिलेने आपल्या पतीला बेदम मारहाण करून ठार केले. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात ही घटना घडली. पतीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल आठ तास ती मृतदेहाजवळ बसून राहिली. त्यानंतर मंदिरात जाऊन देवाकडे क्षमा मागितली आणि थेट पोलिस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली.
ही घटना सोमवारी छतरपूरमधील शिवनगर कॉलनी येथे घडली. दीनदयाल कुशवाहा (वय ३०) असे मृत पतीचे नाव असून तो गवंडी व्यवसाय करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे पती-पत्नी विभक्त राहत होते. सोमवारी दारूच्या नशेत असलेल्या दीनदयालने सकाळी सुमारे १० वाजता पत्नी नीलम कुशवाहा हिच्या घरी गेला. दरवाजा बंद असल्याने त्याने दरवाज्याची कडी तोडून घरात घुसला आणि नीलमचे केस ओढत, तिला मारहाण केली. यादरम्यान त्यांच्या सात वर्षांच्या मुलीबद्दलही त्याने अपशब्द वापरले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नीलमने लाकडी काठीने पतीला मारहाण केली. दीनदयाल खाली कोसळल्यानंतरही तिने त्याला मारहाण सुरूच ठेवली. डोक्याला आणि पायाला झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला तो केवळ बेशुद्ध पडला असावा असे वाटल्याने, नीलम जवळपास आठ तास मृतदेहाशेजारीच बसून राहिली; त्यानंतर तिचे आई-वडील घरी परतले.
कुटुंबीयांनी समजावल्यानंतर, नीलम आत्मसमर्पण करण्यासाठी पायी निघाली. वाटेत ती शहरातील हनुमान मंदिरात थांबली, तेथे सुमारे दहा मिनिटे रडत बसून तिने आपल्या कृत्याबद्दल देवाकडे क्षमा मागितली. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता ती सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात पोहोचली आणि पतीची हत्या केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान नीलमवर अनेक वर्षांपासून अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. ती मागील पाच वर्षांपासून माहेरी राहत होती आणि अलीकडेच तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता. नीलमच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, दीनदयाल त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांनाही वारंवार त्रास देत होता. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.