MP High Court Reduces Husband Sentence : "तुझ्यासारखे १००० पती सांभाळू शकते," या पत्नीच्या वक्तव्याला पतीसाठी तीव्र चिथावणीखोर असल्याचे मानत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पत्नीच्या हत्या प्रकरणातील पतीच्या शिक्षेत मोठी कपात केली आहे. पत्नीच्या विधानामुळे संतापलेल्या पतीने तिची हत्या केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने ही शिक्षा बदलून ७ वर्षांचा सश्रम कारावास केली आहे.
हे प्रकरण मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील चौरई येथील आहे. येथे १८-१९ जुलैच्या रात्री शिवा आणि त्याची पत्नी किरण यांच्यात वाद झाला. हा वाद कुलबहेरी नदीच्या खर्रा घाटाजवळ झाला होता. वादादरम्यान किरणने पतीला टोमणा मारत म्हटले होते की, ती तुझ्यासारखे १००० पती सांभाळू शकते. यानंतर शिवाने रागाच्या भरात दगड उचलून पत्नीच्या डोक्यात मारला, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्यानंतर शिवाने स्वतः पोलिसांना आणि पत्नीच्या नातेवाईकांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती. शिवाच्या वतीने युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलांनी सांगितले की, शिवाविरुद्ध ठोस आणि विश्वासार्ह पुरावे नाहीत. तसेच पुराव्यांमध्ये तफावत आहे, त्यामुळे सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अननिंद्र कुमार सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, शिवानेच पत्नीवर हल्ला केला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. मात्र, ही घटना अचानक झालेल्या वादामुळे घडली. आरोपी हत्येचा कोणताही पूर्वनियोजित कट रचून तिथे गेला होता, असे कुठेही सिद्ध होत नाही.
अशा प्रकारची टिप्पणी पतीचे काहीच मूल्य नसल्याचे दर्शवते. हे केवळ पतीसाठीच नव्हे, तर त्याच्या मानवी अस्तित्वासाठीही आव्हान आहे. अशा प्रकारची टिप्पणी ऐकल्यानंतर पतीने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि ही घटना घडली. न्यायालयाने या गोष्टीचीही दखल घेतली की, घटनेनंतर लगेचच आरोपीने स्वतः पोलीस आणि पत्नीच्या नातेवाईकांना फोन करून याची माहिती दिली होती.
न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अननिंद्र कुमार सिंह यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपीचा पत्नीची हत्या करण्याचा आधीपासूनच हेतू असता, तर तो घटना घडवून तिथून फरार झाला असता. त्याने स्वतः पोलीस किंवा पत्नीच्या नातेवाईकांना फोन करून माहिती दिली नसती, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका जुन्या निकालाचा हवाला दिला, या निकालानुसार, "एखादी व्यक्ती अचानक मिळालेल्या तीव्र चिथावणीमुळे स्वतःवरील नियंत्रण गमावून बसते, तर त्या गुन्ह्याचे मूल्यांकन त्याच आधारावर केले जावे."