Marriage Age report file photo
राष्ट्रीय

Marriage Age report: देशात ५०% लोक अविवाहित; बहुसंख्य मुली १८ वर्षांनंतरच करतात लग्न; सरकारी अहवालात धक्कादायक आकडेवारी

SRS report 2023: केंद्र सरकारच्या SRS अहवालानुसार भारतात मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.९ वर्षे झाले असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत आहे. काही राज्यांत अल्पवयीन मुलींच्या लग्नाचे प्रमाण चिंताजनक आहे.

मोहन कारंडे

Marriage Age report

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत आहेत. तसेच देशभरातील मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.९ वर्षे असल्याचे २०२३ सालच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (SRS) या सांख्यिकी अहवालातून समोर आले आहे. २०२२ मध्ये हे वय २२.७ वर्षे होते.

जम्मू-काश्मीरमध्ये मुलींच्या लग्नाचे सरासरी वय सर्वाधिक

१९९० पासून एसआरएस (SRS) मार्फत दर सहा महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात मुलींच्या लग्नाचा डेटा गोळा केला जातो आणि त्यावरून सरासरी वय ठरवले जाते. पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत अजूनही लक्षणीय संख्येने मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध राज्यांत लग्नाचे सरासरी वय वेगवेगळे असून, पश्चिम बंगालमध्ये हे वय २१.३ वर्षे तर जम्मू-काश्मीरमध्ये २६.३ वर्षे आहे. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांची आकडेवारी पाहता, २०१९ मध्ये मुलींचे सरासरी लग्नाचे वय २२.१, २०२० मध्ये २२.७, २०२१ मध्ये २२.५ आणि २०२२ मध्ये २२.७ वर्षे होते.

ग्रामीण भागात मुलींचे लग्न लवकर

ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलींच्या लग्नाच्या वयात सातत्याने वाढ होत असली तरी दोन्ही ठिकाणी मोठा फरक कायम आहे. २०२३ मध्ये ग्रामीण भागातील सरासरी वय २२.४ वर्षे तर शहरी भागात २४.३ वर्षे होते. २०२२ मध्ये हे वय अनुक्रमे २२.२ आणि २३.९ वर्षे होते.

२.१% मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी

या माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरावर, २.१% महिलांनी १८ वर्षांच्या आधी लग्न केले, २५% महिलांनी १८ ते २० वर्षांच्या दरम्यान लग्न केले आणि ७२.९% महिलांनी २१ किंवा त्याहून अधिक वयात लग्न केले. ग्रामीण भागात, संबंधित टक्केवारी अनुक्रमे २.५%, २८.१% आणि ६९.४% आहे, तर शहरी भागात ती अनुक्रमे १.२%, १७% आणि ८१.८% आहे. मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांच्या आधी लग्न करणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये (६.३%) आणि सर्वात कमी केरळमध्ये (०.१%) आढळले.

विवाह नोंदणीसंबंधी आकडेवारी

अहवालात देशातील वैवाहिक स्थिती संदर्भातील आकडेवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

  • अविवाहित

एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित आहेत, ज्यात पुरुषांचे प्रमाण (५५.४%) महिलांपेक्षा (४५.३%) जास्त आहे.

बिहारमध्ये अविवाहित लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक (५८.३%) आहे, तर तामिळनाडूमध्ये ती सर्वात कमी (४१.३%) आहे.

  • विवाहित

एकूण लोकसंख्येपैकी ४५.९% लोक विवाहित आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (४९.०%) पुरुषांपेक्षा (४२.९%) जास्त आहे.

विवाहित लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (५१.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (४०.२%) नोंदवली गेली.

  • विधवा/घटस्फोटित/वेगळे राहणारे

एकूण लोकसंख्येपैकी ३.६% लोक विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणारे आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (५.६%) पुरुषांपेक्षा (१.७%) जास्त आहे.

विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणाऱ्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (६.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (१.५%) नोंदवली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT