Mohammad Irfan CJP Protest Pudhari
राष्ट्रीय

Mohammad Irfan: शाळेत गेला नाही पण संविधान तोंडपाठ; CJPच्या आंदोलनात व्हायरल झालेला इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

Mohammad Irfan CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान संविधानावरील भाषणामुळे मोहम्मद इरफान हे सोशल मीडियावर चर्चेत आले.

पुढारी वृत्तसेवा

Mohammad Irfan CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक चेहरे चर्चेत आले. त्यापैकी मोहम्मद इरफान हे नाव सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान संविधान आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेली भूमिका अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. यानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली.

काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भेटीची माहिती देताना इरफान यांचे कौतुक केले. पक्षाच्या पोस्टमध्ये म्हटले की, मोहम्मद इरफान यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्पष्ट शब्दांत देशातील युवकांच्या वेदना आणि अपेक्षा मांडल्या. तसेच इरफानसारख्या प्रत्येक तरुणासोबत उभे राहण्याचा आणि समान संधी, सन्मान, बंधुता व प्रेमाने भरलेला भारत घडवण्याचा निर्धारही काँग्रेसने व्यक्त केला.

कोण आहेत मोहम्मद इरफान?

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय मोहम्मद इरफान हे दिल्लीत फेरीवाला (हॉकर) म्हणून काम करतात. ते शाळेत गेले नसल्याचे सांगितले जाते. मात्र, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने त्यांनी भारतीय संविधान आणि विविध सामाजिक विषयांचा अभ्यास केला आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता आणि तेथील त्यांच्या भाषणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

राहुल गांधींची धर्मेंद्र प्रधानांवर टीका

दरम्यान, राहुल गांधी यांनी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर आरोप केले.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचार आणि देशातील बिघडलेल्या शिक्षण व्यवस्थेचे प्रतीक आहेत." तसेच शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनाची पार्श्वभूमी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांचे व्हिडिओ आणि भाषणे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यापैकी मोहम्मद इरफान हे नाव विशेष चर्चेत आले असून, राहुल गांधींसोबतच्या त्यांच्या भेटीनंतर त्यांबद्दल अधिक चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT