

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार दिवसांपूर्वी चिनी सैनिकांचे जीव वाचवल्याबद्दल भारतीय लष्कराचे आभार मानणार्या चीनने पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे समोर आले आहे. चीनने भारतीय सीमेनजीकच्या आपल्या एअरबेसवर फ्रंटलाईन जे-२० 'मायटी ड्रॅगन' स्टील्थ फायटर जेट्सची तैनाती वाढवली आहे. चीनने यावर्षी जून अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला आपल्या दोन एअरबेसवर ११ जे-२० जेट्स तैनात केल्याचे 'द वॉर झोन'च्या एका अहवालात सॅटेलाईट छायाचित्रांच्या आधारे नमूद केले आहे.
वेंटरकडून मिळालेल्या या अहवालानुसार, ९ जुलै रोजी, शिनजियांग उईघुर स्वायत्त प्रदेशातील होतान एअरबेसच्या (नागरी व लष्करी अशा दोन्ही कामांसाठी वापर) धावपट्टीवर सात जे-२० लढाऊ विमाने दिसून आली. हा बेस लेहपासून ३८९ कि.मी. ईशान्येला आणि उत्तर लडाखमधील भारतीय हवाई दलाच्यादौलत बेग ओल्डी एअरफील्डपासून अवघ्या २४५ कि.मी. ईशान्येला आहे. प्रसारमाध्यमांना मिळालेल्या कमर्शियल सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये कुठल्याही चीनी एअरबेसवर दिसलेली जे-२० विमानांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. या अहवालात प्रसिद्ध दुसऱ्या छायाचित्रात तिबेटच्या ल्हासा परिसरातील डॅमसंग एअरबेसच्या फ्लाईटलाईनवर चार जे-२० विमाने दिसत आहेत. हा बेस अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून ३४४ कि.मी. वायव्येला आहे.
"होतानमध्ये सात व डॅमसंगमध्ये चार जे-२० विमानांची उपस्थिती भारतासमोरील उंच ठिकाणांवरील बेसवरून पाचव्या पिढीतील विमानांचे ऑपरेशन करणे ही आता चीनी हवाई दलासाठी सामान्य बाब आहे. तो कोणताही देखावा किंवा संकेत राहिला नसल्याचे स्पष्ट करते, असे भारतातील एरोस्पेस आणि डिफेन्स संशोधन व विकास कंपनी 'न्यूस्पेस'चे सहसंस्थापक व माजी फायटर पायलट समीर जोशी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.
काय आहे जे-२० जेट
* जे-२० जेट यातील 'स्टील्थ' क्षमतेच्या बळावर वादग्रस्त हवाई क्षेत्रात दबदबा निर्माण करू शकते.
* प्रगत स्टील्थ रचनेमुळे याचे रडार सिग्नेचर खूप कमी.
* याचमुळे जे-२० ला आयएएफच्या सध्याच्या पिढीतील फायटर जेटस्च्या (स्टील्थ क्षमता नसलेल्या फ्रान्सनिर्मित डसॉल्ट राफेलचाही समावेश) तुलनेत मोठी आघाडी मिळते.
* सध्या चीनच्या हवाई दलाकडे तब्बल ५०० च्या आसपास जे-२० जेट फायटर विमाने आहेत.
* ही संख्या २०१९ मध्ये सुमारे ५० होती.