PM Narendra Modi Varanasi visit criticises Akhilesh Yadav
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना ठार मारण्याच्या वेळेवरून अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पंतप्रधान मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
"दहशतवाद्यांना मारण्यासाठी तुम्हाला फोन करून विचारायचं का? त्यांना पळून जाण्याची संधी द्यायची का?" अशा थेट आणि बोचऱ्या शब्दांत मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
पंतप्रधान मोदी शनिवारी वाराणसीमध्ये होते. येथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या 'व्होट बँकेच्या राजकारणा'वर सडकून टीका केली.
पंतप्रधान मोदींनी अखिलेश यादव यांच्या संसदेतील वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, "समाजवादी पक्षाचे नेते संसदेत विचारतात की, पहलगामच्या दहशतवाद्यांना आत्ताच का मारले? मग आम्ही काय करायला हवं?
त्यांना मारण्यापूर्वी समाजवादी पक्षाच्या लोकांना फोन करून विचारायचं का? तुम्हाला विचारू का, की त्यांना कधी मारायचं आहे? दहशतवाद्यांना मारण्यासाठी मुहूर्त शोधावा लागेल का? त्यांना पळून जाण्याची संधी द्यायची आहे का?"
पंतप्रधानांनी आपला हल्ला अधिक तीव्र करत समाजवादी पक्षाच्या पूर्वीच्या सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "हे तेच लोक आहेत, जे सत्तेत असताना दहशतवाद्यांना क्लीन चिट देत होते. बॉम्बस्फोट करणाऱ्या दहशतवाद्यांवरील खटले मागे घेत होते. आता त्यांना दहशतवादी मारले गेल्याने त्रास होत आहे, 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी झाल्याने त्रास होत आहे."
'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत पंतप्रधान मोदी भावूक झाले. ते म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरनंतर मी पहिल्यांदा काशीला आलो आहे. पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. माझे हृदय दुःखाने भरले होते.
मी माझ्या लेकींच्या सिंदूरचा बदला घेण्याची शपथ घेतली होती आणि महादेवाच्या आशीर्वादाने मी ती पूर्ण केली. 'ऑपरेशन सिंदूर'चे यश मी महादेवाच्या चरणी समर्पित करतो."
या राजकीय टीकेसोबतच पंतप्रधान मोदींनी वाराणसीला विकासाची मोठी भेट दिली. त्यांनी एकूण ५२ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली, ज्यांची एकूण किंमत 2183.45 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमध्ये
रस्ते बांधकाम आणि रुंदीकरण, रुग्णालयांचे आधुनिकीकरण, शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा, धार्मिक पर्यटनासाठी पक्क्या घाटांचे बांधकाम, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि पार्किंग सुविधांचा विस्तार, तलावांचे नूतनीकरण, ग्रंथालये आणि प्राणी रुग्णालयांची स्थापना अशा कामांचा समावेश आहे.