राज्‍यसभेतील प्रश्‍नोत्तर तासावेळी बाेलताना केंद्रीय गृहराज्‍यमंत्री नित्‍यानंद राय. X
राष्ट्रीय

दहशतवादी एक तर तुरुंगात राहतील किंवा नरकात जातील

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काश्‍मीरसह देशाच्‍या सुरक्षेला केंद्र सरकारचे सर्वोच्‍च प्राधान्‍य आहे. दहशतवादी एकतर तुरुंगात राहतील किंवा नरकात जातील, असे राज्‍यसभेतील प्रश्‍नोत्तर तासावेळी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री नित्‍यानंद राय यांनी आज (दि. २४) सांगितले. ५ ऑगस्‍ट २०१९ राेजी विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सैन्‍यदलाने 900 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशीही माहिती त्‍यांनी यावेळी दिली.

३७० कलम हटविल्‍यापासून ९०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी बोलताना नित्‍यानंद राय म्‍हणाले की, ऑगस्ट 2019 मध्ये विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्‍या आले. तेव्‍हापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने 900 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद पूर्णपणे संपवण्याचा संकल्प व्यक्त करताना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये २८ दहशतवादी मारले गेले आहेत. आमचे काही जवान शहीद झाले आहेत.

यावर राजकारण होता कामा नये...

२००४ ते २०१४ या काळात दहशतवादी हल्‍ल्‍यांची संख्‍या ७२१७ होती. तर २०१४ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत २२५९ दहशतवादी हल्‍ले झघले आहेत. अशा प्रकारचे हल्‍ले घडायला नको होते. यावर राजकारण होता कामा नये. केंद्र सरकारच्‍या धोरणानुसार दहशतवादी एकतर तुरुंगात राहतील किंवा नरकात जातील.

२००४ ते २०१४ या काळात झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांच्‍या जवानांसह २८२९ नागरिकांनी हल्‍ल्‍यांमध्‍ये आपला जीव गमावला होता. गेल्या दहा वर्षांत दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या संख्‍यते ६७ 67 टक्क्यांनी घट झाली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये अनुकूल वातावरण आहे, शाळा आणि महाविद्यालये सुरू होत आहेत, व्यवसाय विस्तारत आहे आणि पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, अशीही माहिती त्‍यांनी सभागृहाला दिली.

जम्‍मू-काश्‍मीरसाठी 58477 कोटी रुपयांची तरतूद

काश्मीरला जाणारे पर्यटक त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. दहशतवादी हल्ल्यांमुळे पर्यटकांच्या मनात चिंता निर्माण होते. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथे कोणती व्यवस्था करण्यात आली आहे? असा सवाल काँग्रेसच्‍या प्रमोद तिवारी यांनी केला. यावर राय म्हणाले की, 2023 मध्ये 2 कोटी 11 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे. यावरुन तेथील सुरक्षा स्थिती स्‍पष्‍ट होते. 2014 पूर्वी पर्यटक काश्मीरमध्ये जाण्यास घाबरत होते. भारत सरकारच्या 15 मंत्रालयांनी 58477 कोटी रुपयांची तरतूद केली, ज्यामुळे जम्‍मू-काश्‍मीरच्‍या विकासाला चालना मिळाली आहे. याअंतर्गत 53 प्रकल्प सुरू करण्यात आले असून, त्यापैकी 35 प्रकल्प पूर्ण होणार असल्‍याची महितीही त्‍यांनी दिली.

काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतण्यासाठी प्रयत्न सुरू

काश्मिरी पंडितांबद्दल विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना राय म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील अत्याचारांमुळे काश्मिरी पंडित एकेकाळी खोऱ्यातून पळून गेले होते. काश्मिरी पंडितांच्या तिथून स्थलांतर होण्यामागे व्होट बँकेचे राजकारण आणि कारस्थान हे प्रमुख कारण आहे. काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यात परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT