Meta Mistranslation on CM Siddaramaiah
बेंगळुरू : मेटाच्या ऑटो-ट्रान्सलेशन टूलच्या चुकीमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मृत घोषित केले होते. टूलने हा अनुवाद चुकीचा केला होता. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मेटाच्या कार्यालयाकडे तीव्र आक्षेप नोंदवला. यावर कन्नड ट्रान्सलेशनमध्ये काही काळ गडबड झाली होती. आम्ही त्या समस्येचे निराकरण केले आहे. आम्हाला याबद्दल खेद आहे, असे मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बहुभाषिक स्टार आणि ज्येष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली. हा संदेश कन्नड भाषेत लिहिला होता. हा शोक संदेश १५ जुलैरोजी मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मेटाने त्याचा अनुवाद मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे काल निधन झाले, असा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया कंपनी मेटाच्या ट्रान्सलेशन फीचरवर आक्षेप घेतला. मेटाला १६ जुलैरोजी पत्र पाठवण्यात आले. त्यात म्हटले होते की, मेटाने आपले कन्नड ऑटो-ट्रान्सलेशन फीचर तात्पुरते बंद करावे.
१५ जुलै रोजी कर्नाटक सीएम ऑफिसकडून फेसबुकवर एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात सिद्धरामय्या अभिनेत्रीच्या फोटोवर फुले अर्पण करताना दिसत होते. पोस्टमध्ये लिहिले होते - "बेंगळुरूमध्ये मी बहुभाषिक स्टार आणि अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, ज्यांचे काल निधन झाले होते. बी. सरोजा देवी या एक असाधारण अभिनेत्री होत्या. त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांत काम केले." मात्र, या पोस्टचे ट्रान्सलेशन करताना मेटाकडून चूक झाली.
सीएम सिद्धरामय्या यांचे मीडिया सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांनी सांगितले की, आम्ही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कन्नडमधून इंग्रजीमध्ये ऑटो ट्रान्सलेशन अनेकदा चुकीचे होते आणि काही प्रकरणात तर अत्यंत दिशाभूल करणारे असते. अशा चुका गोंधळ निर्माण करू शकतात. विशेषतः जेव्हा त्यात अधिकृत निवेदन किंवा सीएम किंवा सरकारचे महत्त्वाचे संदेश असतात. लोकांना हे समजत नाही की ते जे वाचत आहेत, ते मूळ संदेश नसून ऑटो ट्रान्सलेशनमधून आलेला संदेश आहे.
मेटा आपल्या प्लॅटफॉर्मवर कन्नड कंटेंटचे ऑटो ट्रान्सलेट करून तथ्यांची तोडमोड करत आहे. त्यामुळे युजर्स गोंधळात पडत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने जबाबदारीने काम करायला हवे. मेटाकडे कन्नड ऑटो-ट्रान्सलेशनवर तात्पुरती बंदी घालण्याचीही विनंती करण्यात आली, जोपर्यंत ते सुधारले जात नाही. मात्र, सीएमने आक्षेप नोंदवल्यानंतर मेटाने ट्रान्सलेशनमध्ये सुधारणा केली आहे.