Delhi CM Rekha Gupta Atal Canteen  Pudhari
राष्ट्रीय

Delhi Atal Canteen | राजधानी दिल्लीत आता केवळ 5 रुपयांत मिळणार जेवण; स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा...

Delhi Atal Canteen | मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली 'अटल कँटीन'ची घोषणा

Akshay Nirmale

Delhi CM Rekha Gupta Atal Canteen Rs 5 meals Affordable food scheme

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिल्लीत आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एक ऐतिहासिक आणि जनतेसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.

'अटल कँटीन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या योजनेअंतर्गत, दिल्लीतील कामगारांना केवळ 5 रुपयांमध्ये पौष्टिक जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अन्न सुरक्षा आणि पोषण उपलब्ध करून देणे हा आहे.

'अटल कँटीन' म्हणजे काय?

रेखा गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सुरुवातीला 100 अटल कॅंटीन विविध झोपडपट्टी वस्त्यांमध्ये सुरू करण्यात येणार असून, यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. हा उपक्रम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू करण्यात येत आहे.

या योजनेची प्रेरणा तामिळनाडूमधील 'अम्मा कँटीन' या यशस्वी योजनेतून घेतली आहे, जी माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी 2013 मध्ये सुरू केली होती. त्या कँटीनमध्ये 1 रुपयात इडली, 3 रुपयात ताकभात, 5 रुपयात सांबार भात मिळतो. दिल्लीतील अटल कँटीनमध्येही अशाच स्वरूपाचे सुलभ आणि परवडणारे जेवण दिले जाणार आहे.

गिग वर्कर्ससाठी कल्याण मंडळ

दिल्लीतील गिग वर्कर्स (जसे की फूड डिलिव्हरी, कॅब ड्रायव्हर्स, फ्रीलान्सर) यांच्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे त्यांना विमा, निवृत्ती वेतन आणि अन्य सामाजिक सुरक्षा लाभ मिळवता येणार आहेत.

झोपडपट्टीवासीयांसाठी पक्की घरे

मुख्यमंत्र्यांनी आणखी एक मोठी घोषणा करत सांगितले की, दिल्लीतील सर्व झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हे सरकारचे प्रमुख धोरण असून, झोपडपट्ट्यांमधील राहणीमान उंचावण्यासाठी ही योजना लवकरच अंमलात आणली जाणार आहे.

यमुना नदीचे पुनरुज्जीवन

दिल्ली सरकारने यमुना नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प देखील केला आहे. यमुनेच्या किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवून त्याचे सौंदर्यीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे.

भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ दिल्लीचा संकल्प

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, "दिल्लीला अस्वच्छता, भ्रष्टाचार आणि लालफीतशाहीपासून मुक्त करून देशातील आदर्श राजधानी बनवणे हे आमचे ध्येय आहे."

रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जनतेसाठी महत्त्वाच्या आणि परिवर्तनात्मक घोषणा केल्या आहेत. या योजनांमुळे दिल्लीतील सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT