Maruti Suzuki
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय ग्रँड विटारा एसयूव्हीच्या ३९,५०६ युनिट्समध्ये तांत्रिक दोष आढळल्यामुळे त्या गाड्या परत मागवल्या आहेत. बाजारात दाखल झालेल्या या नवीन एसयूव्हीमध्ये इंधन गेज दाखवणाऱ्या प्रणालीत मोठी त्रुटी आढळल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२५ या काळात तयार झालेल्या ग्रँड विटारा एसयूव्हीच्या युनिट्समध्ये ही समस्या आहे. या गाड्यांमध्ये फ्यूल गेज (इंधनाची पातळी दाखवणारा काटा) नीट काम करत नसल्याची तांत्रिक समस्या आढळली आहे. या समस्येमुळे, स्पीडोमीटरवरील इंधन पातळी दाखवणारा इंडिकेटर आणि वॉर्निंग लाईट टाकीतील इंधनाची खरी माहिती कधीकधी चालकाला देत नाहीत. यामुळे ड्रायव्हरला गाडीत किती पेट्रोल किंवा डिझेल शिल्लक आहे, हे व्यवस्थित कळत नाही.
हा एक खबरदारीचा उपाय असल्याचे मारुती सुझुकीने सांगितले आहे. या कार ग्राहकांशी कंपनी स्वतः किंवा त्यांचे अधिकृत डीलर संपर्क साधतील. ग्राहकांना मारुतीच्या जवळच्या वर्कशॉपमध्ये बोलावले जाईल. तिथे तज्ज्ञ तंत्रज्ञ इंधन गेजची तपासणी करतील. गरज पडल्यास, हा पार्ट पूर्णपणे बदलला जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या दुरुस्तीसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.
ग्रँड विटारा ही मारुती सुझुकीची एक प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी टोयोटासोबत मिळून बनवली गेली आहे. या गाडीत हायब्रिड इंजिन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सारखे आधुनिक फीचर्स आहेत. अलीकडेच जीएसटी सुधारणांमुळे कंपनीने तिच्या किमतीत १,०७,००० पर्यंत कपात जाहीर केली होती. सध्या या एसयूव्हीची किंमत १०.७७ लाख ते १९.७२ लाख रूपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. पेट्रोल मॉडेल २१.११ किमी/लिटर आणि सीएनजी मॉडेल २६.६ किमी/किलोपर्यंत मायलेज देते.