Anti-Naxal Operation Top Maoist leaders killed in Chhattisgarh
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार नक्षलविरोधी मोहिमेमध्ये गेल्या तीन दिवसांत किमान सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचे दोन महत्त्वाचे नेतेही ठार झाले असून, ही घटना राज्यासाठी आणि देशासाठी नक्षलवादविरोधी मोहिमेतील मोठा टप्पा मानली जात आहे.
ही मोठी कारवाई बीजापूर जिल्ह्यातील घनदाट इंद्रावती नॅशनल पार्क क्षेत्रात सुरू आहे. या भागात सुरक्षा दलांनी 7 मृतदेह हस्तगत केले असून त्यामध्ये माओवादींच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य नरसिंह चाळम ऊर्फ सुधाकर आणि तेलंगणा राज्य समितीचा (TSC) विशेष विभाग सदस्य भास्कर ऊर्फ मईलारापू अडेल्लू यांचा समावेश आहे.
सुधाकरवर ₹४० लाखांचे इनाम होते तर भास्करवर छत्तीसगड आणि तेलंगणा सरकारकडून मिळून ₹४५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यात सुधाकर आणि भास्कर यांचाही समावेश आहे.”
शनिवारी दोन मृतदेह सापडले असून त्याआधी शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. उर्वरित दोन महिलांसह अन्य नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटवली गेलेली नाही.
ही कारवाई गेल्या तीन आठवड्यांत माओवाद्यांच्या नेतृत्वावर झालेली तिसरी मोठी कारवाई आहे. 21 मे रोजी नारायणपूर जिल्ह्यातील अबूजमाड जंगल परिसरात सीपीआय (माओवादी) चे महासचिव नामबाला केशव राव ऊर्फ बसवराज (70) आणि 26 अन्य माओवादी ठार करण्यात आले होते.
अधिकाऱ्यांच्या मते, बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेली ही मोहीम माओवादींच्या दहशतीपासून जंगल भाग पूर्णपणे मुक्त करण्यासाठी आखण्यात आलेली असून, त्यांच्या नेतृत्वाचा कणा मोडण्यासाठी हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.
ही मोहीम 4 जून रोजी सुरू करण्यात आली असून, त्याआधी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे दंडकारण्य विशेष प्रादेशिक समितीशी (DKSZC) संबंधित वरिष्ठ नेते सुधाकर, बांदी प्रकाश, पप्पा राव यांची उपस्थिती असल्याचे समजले होते.
छत्तीसगड पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स (STF), जिल्हा राखीव गट (DRG) आणि CRPF च्या कोब्रा कमांडो युनिटच्या संयुक्त पथकांनी या मोहिमेत भाग घेतला आहे.
चकमकीनंतर दोन AK-47 रायफल्स, स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व दारुगोळा हस्तगत करण्यात आले आहेत. या भागात अजूनही शोध मोहीम आणि क्षेत्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या नक्षलवाद विरोधी मोहिमेदरम्यान काही जवान सर्पदंश, मधमाश्यांचे हल्ले, पाण्याअभावी अशक्तपणा यामुळे जखमी झाले होते. त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.