Manipur ethnic violence file photo
राष्ट्रीय

Manipur: शारीरिक-मानसिक जखमा भरल्याच नाहीत...; अडीच वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या २० वर्षीय तरुणीचा मृत्यू

Manipur Gang Rape Horror: मणिपूरमधील वांशिक दंगलीदरम्यान जमावाकडून लैंगिक अत्याचार झालेल्या कुकी-झो समुदायाच्या २० वर्षीय तरुणीचा अखेर न्यायाच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Manipur Gang Rape Horror

इम्फाळ: मे २०२३ मध्ये मणिपूरमधील वांशिक दंगलीदरम्यान जमावाकडून लैंगिक अत्याचार झालेल्या कुकी-झो समुदायाच्या २० वर्षीय तरुणीचा अखेर न्यायाच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला. जेव्हा तिचे अपहरण करून तिला एका सशस्त्र गटाच्या स्वाधीन करण्यात आले, तेव्हा ती केवळ १८ वर्षांची होती.

'इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम' ने दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. गेल्या दोन वर्षांपासून ती शारीरिक आणि मानसिक जखमांशी झुंज देत होती. अडीच वर्षांपूर्वी दाखल झालेली एफआयआर अजूनही इम्फाळ पूर्व येथील पोरमपत पोलीस ठाण्यात प्रलंबित आहे. तिच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचीही अद्याप ओळख पटलेली नाही.

कॅन्डल लाइट मार्च आणि न्यायाची मागणी

तिच्यावर झालेल्या अत्याचारानंतरच्या ३० महिन्यांच्या वेदनादायी प्रवासासाठी जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी 'कमिटी ऑन ट्रायबल युनिटी'सह विविध कुकी-झो संघटनांनी शनिवारी मेणबत्ती मोर्चा काढला होता. ही घटना घडल्यानंतर दोन महिन्यांनी, २१ जुलै २०२३ रोजी तिने कांगपोकपी पोलिसांकडे प्रथम तक्रार नोंदवली होती.

नेमकी काय होती घटना?

मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारातून जीव वाचवून पळ काढल्यानंतर तिने ही तक्रार दिली होती. एफआयआरनुसार, १५ मे २०२३ रोजी इम्फाळमधील 'न्यू चेकॉन' येथील एटीएम बूथजवळून तिचे अपहरण करण्यात आले होते. वांशिक संघर्षात सामील असलेल्या एका गटातील काही महिलांनी तिला एका सशस्त्र गटाच्या चार पुरुषांच्या ताब्यात दिले. ते तिला डोंगरामध्ये घेऊन गेले, तिथे तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिला ओढ्यात फेकून दिले.

भाजीपाला घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाने वाचवले

भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने तिला वाचवले होते. दुसऱ्या दिवशी तिने इम्फाळमधून पळ काढला आणि कांगपोकपी येथील रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर तिला नागालँडमधील कोहिमा आणि नंतर आसाममधील गुवाहाटी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.

'बेटी बचाओ' संकल्पनेचा दाखला

स्थानिक आदिवासी नेते मंच (आयटीएलएफ) या संघटनेने म्हटले आहे की, अनेक महिन्यांच्या उपचारानंतरही ती गर्भाशयाशी संबंधित आजार आणि खोल मानसिक धक्क्यातून सावरू शकली नाही. या संघटनेने तिचा मृत्यू हा वांशिक हिंसाचारादरम्यान समुदायाला सोसाव्या लागलेल्या अत्याचाराचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. 'कमिटी ऑन ट्रायबल युनिटी'ने केंद्र सरकारला या तरुणीला न्याय देण्याची विनंती केली असून, गुन्हेगारांना शिक्षा दिल्यास पंतप्रधानांच्या 'बेटी बचाओ' संकल्पाचा सन्मान होईल, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT