Mamata Banerjee on Abhishek Banerjee attack
कोलकाता : सोनारपूर येथे अभिषेक यांच्या डोक्यावर वेळेत हेल्मेट घातले गेले नसते, तर त्यांचा जीवही जाऊ शकला असता, असा खळबळजनक आरोप पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच या हल्ल्यानंतर अभिषेक यांच्या छातीत 'रक्ताच्या गाठी' (blood clots) झाल्या असून बरगड्यांना दुखापत झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर हिंसेचा बळी ठरलेल्या दक्षिण २४ परगणा येथील सोनारपूरमधील पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी अभिषेक बॅनर्जी शनिवारी (दि. ३० मे) सोनपूरला गेले होते. तिथे अचानक जमावाने त्यांना घेरले, त्यांच्यावर अंडी फेकली. अभिषेक बॅनर्जी यांचा विरोध करणाऱ्या या गर्दीने त्यांच्याविरोधात "चोर, चोर" अशा घोषणाही दिल्या. सामोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अभिषेक बॅनर्जी पांढऱ्या शर्टात आणि क्रिकेट हेल्मेट घालून मोठ्या गर्दीच्या मधून चालताना दिसत आहेत, तर गर्दी त्यांच्यावर ओरडत असून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करत आहे.
"मला माहिती मिळाली आहे की, जर त्या ऐनवेळी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट घातले गेले नसते, तर त्याचे गंभीर आणि प्राणघातक परिणाम होऊ शकले असते," असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. लोकांच्या दगडफेकीमुळे आणि शारीरिक हल्ल्यामुळे त्यांच्या पुतण्याच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच अभिषेक यांच्यावरील उपचाराबाबत त्यांनी रुग्णालयांवर तीव्र संताप व्यक्त केला. अभिषेक यांना सुरुवातीला ईएम बायपासवरील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांना शहरातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अभिषेक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचलेल्या ममता बॅनर्जी यांनी "इथे कोणतेही उपचार केले जात नाहीत," असा आरोप केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर खरोखरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती, तर मग त्यांना आधी आयटीयू (ITU) मध्ये का नेण्यात आले, दोन तास निरीक्षणाखाली का ठेवले गेले आणि अनेक वैद्यकीय चाचण्या व स्कॅन करण्याचा सल्ला का दिला गेला? त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना अनेक जखमा झाल्याचे पाहिले आणि तातडीने वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या चेहऱ्यावर, पाठीवर, छातीवर आणि मानेवर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. रुग्णालयांवर अभिषेक यांच्यावर योग्य उपचार न करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन दडपण आणले गेले, असा आरोपही त्यांनी केला.
"राजकारण हे राजकीय पातळीवरच लढले पाहिजे. राजकीय मतभेदांचे उत्तर हिंसा, धमकी, शस्त्रे किंवा भीती हे असू शकत नाही, असे सांगत अभिषेक यांचे उपचार त्यांच्या विश्वासू डॉक्टरांच्या आणि कौटुंबिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिला.