Sindhu Water : भारताने ६५ वर्षांपूर्वी सद्भावनेतून सिंधू जल करार केला; परंतु पाकिस्तानने या कराराच्या आत्म्याचा भंग केला आहे. भारतावर तीन युद्धे लादून आणि हजारो दहशतवादी हल्ले घडवून आणले. या हल्ल्यांमध्ये २०,००० हून अधिक भारतीयांचा बळी गेला आहे. नुकताच पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही यामध्ये समावेश आहे. भारताने सतत विलक्षण संयम दाखवला आहे. जो देश दहशतवादी आणि नागरिकांमध्ये कोणताही फरक करत नाही, त्याला नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू जल करार अमलात आणला जाणार नाही, अशा शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्र (युनाे) संघातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी हरी पुरी यांनी पाकिस्तानला ठणकावले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण" या विषयावरील बोलत होते.
यावेळी पुरी यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेल्या निराधार आरोपांना मी उत्तर देणे आवश्यक समजतो. भारताने अनेक दशके पाकिस्तानप्रायोजित दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. अशा देशाने नागरिकांच्या संरक्षणावर चर्चा करणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा अवमान आहे. जो देश दहशतवादी आणि नागरिकांमध्ये फरक करत नाही, त्याला नागरिकांच्या सुरक्षेवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही," असे त्यांनी ठणकावले.
भारताच्या प्रगती, समृद्धी आणि आत्मबळावर आघात करण्यासाठी पाकिस्तानने दशकानुदशके दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. याच महिन्यात पाकिस्तानी लष्कराने जाणूनबुजून भारतीय सीमेवरील गावांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यांमध्ये २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि ८० हून अधिक जखमी झाले आहेत. गुरुद्वारे, मंदिरे, ख्रिस्ती मठ अशा धार्मिक स्थळांनाही उद्देशून लक्ष्य केले गेले. सीमेवरील गावातील आरोग्य सुविधा देखील लक्ष्य करण्यात आल्या. एकीकडे दशतवादाला पोसायचे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन उपदेश कारणे म्हणजे ढोंगीपणाचे प्रतीक आहे, असेही पुरी यांनी सुनावले.
"२६/११ चा मुंबईवरील भयानक हल्ला असो वा एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेला पर्यटकांवरील हल्ला पाकिस्तानी दहशतवादाचे बळी सामान्य नागरिकच राहिले आहेत. पाकिस्तानने वारंवार दहशतवादाला खतपाणी घातले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे वरिष्ठ सरकारी, पोलीस आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. दहशतवाद आणि सामान्य नागरिकांमध्ये फरक न करणार्या देशाला नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. अशा देशाने नागरिकांच्या संरक्षणावर चर्चा करणे हे अत्यंत निंदनीय आहे. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत सिंधू जल करार अमलात आणला जाणार नाही, असेही पुरी यांनी स्पष्ट केले.