राष्ट्रीय

Major Navya Shekhawat : राष्ट्रपती मुर्मूंसोबत सावलीसारख्या राहणाऱ्या मेजर नव्या शेखावत कोण आहेत? अवघ्या ५ वर्षांत रचला इतिहास

राजस्थानच्या सुपुत्री आणि देशाच्या पहिल्या महिला आर्मी एडीसी, मेजर नव्या शेखावत यांचा पगार किती आहे? जाणून घ्या तपशील

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मेजर ऋषभ सिंह संब्याल यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या ताफ्यात एका नव्या नावाची भर पडली असून, मेजर नव्या शेखावत यांच्या नियुक्तीची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रपतींच्या 'एडीसी' (एड्स-डी-कॅम्प) या अत्यंत प्रतिष्ठेच्या व संवेदनशील पदावर रुजू होणाऱ्या त्या भारतीय भूदलाच्या (इंडियन आर्मी) पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

तिन्ही सशस्त्र दलांचा विचार करता, हा बहुमान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी २०२५ मध्ये भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांनी देशाच्या पहिल्या महिला एडीसी म्हणून इतिहास रचला होता. आता विविध अधिकृत समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये मेजर नव्या शेखावत या राष्ट्रपतींच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत कार्यरत दिसत आहेत.

अवघ्या 5 वर्षांच्या लष्करी सेवेत मेजर पदापर्यंत मजल

मूळच्या राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या मेजर नव्या शेखावत यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 'कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस' (CDS) परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 'सीडीएस-१ (२०२०)' च्या महिला गुणवत्ता यादीत सातवे स्थान पटकावल्यानंतर त्यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA), चेन्नई येथून खडतर शारीरिक व मानसिक लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांना 'आर्मी सर्व्हिस कॉर्प्स'मध्ये (ASC) कमिशन मिळाले. हे कॉर्प्स लष्कराच्या रसद, पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेची महत्त्वपूर्ण धुरा सांभाळते. अवघ्या पाच वर्षांच्या लष्करी सेवेत मेजर पदापर्यंत मजल मारत जुलै २०२६ मध्ये त्यांनी थेट राष्ट्रपती भवनातील या सर्वोच्च शिष्टाचार पदाची सूत्रे स्वीकारली.

सशस्त्र दलांमधील वाढता महिला सहभाग

लष्करामध्ये १९९२ मध्ये महिलांचा प्रवेश शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून सुरू झाला होता. त्यानंतर धोरणात्मक बदल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे महिलांसाठी अधिकाधिक संधी खुल्या झाल्या. अशा पार्श्वभूमीवर मेजर शेखावत यांची ही नियुक्ती सशस्त्र दलांमधील वाढता महिला सहभाग आणि गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण मानली जात आहे.

ADC पदाची नेमकी भूमिका आणि शिष्टाचार

राष्ट्रपतींचे एडीसी हे केवळ औपचारिक किंवा बाह्य सुरक्षेपुरते मर्यादित पद नसून, ते देशातील सर्वांत काटेकोर व घटनात्मक शिष्टाचाराशी (प्रोटोकॉल) जोडलेले सर्वोच्च कर्तव्य आहे. परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या दिमतीला एकूण पाच एडीसी असतात; ज्यामध्ये भूदलाचे तीन, तर नौदल आणि हवाई दलाचा प्रत्येकी एक अशा अत्यंत निवडक व गुणवंत अधिकाऱ्यांचा समावेश असतो. देश-विदेशांचे दौरे, उच्चस्तरीय राजनैतिक बैठका, परदेशी पाहुण्यांचे स्वागत, सैनिकी सोहळे आणि अधिकृत संवादाचे समन्वय राखणे ही अत्यंत जबाबदारीची कामे हे अधिकारी चोख पार पाडतात.

वेतनश्रेणी आणि VVIP सुविधा

मेजर शेखावत यांचे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या 'पे-मॅट्रिक्स लेव्हल-११' नुसार निश्चित केले जाते. यामध्ये सुमारे ६९,७०० रुपये मूळ वेतनासह (बेसिक पे), १५,५०० रुपये 'मिलिटरी सर्व्हिस पे' (MSP), महागाई भत्ता (DA) आणि विशेष शिष्टाचार भत्त्यांचा समावेश होतो. यामुळे त्यांचे एकूण मासिक वेतन अंदाजे १.२ लाख ते १.५ लाख रुपयांपेक्षा अधिक होते.

याशिवाय, राष्ट्रपती भवनाच्या कार्यकक्षेत सेवा बजावत असल्याने त्यांना उच्च दर्जाचे व्हीव्हीआयपी शासकीय निवासस्थान, अखंड पाणी-वीज व देखभालीची मोफत व्यवस्था, अधिकृत दौऱ्यांसाठी विशेष सुरक्षा वाहन, अधिकारी व कुटुंबीयांसाठी लष्करी रुग्णालयांमधील (MH) मोफत व उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा, तसेच सर्वसमावेशक विमा आणि सेवा निवृत्तीनंतर निवृत्तिवेतनाचे सर्व लाभ केंद्र सरकारकडून पुरवले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT