Madras High Court : महिला जिल्हाधिकाऱ्यांनी सत्ताधारी 'टीव्हीके' (TVK) पक्षाच्या आमदारावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची दखल न घेतल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने आज (दि. २४) जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर ताशेरे ओढले. काही महिन्यांपूर्वीच तक्रार देऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही, शासन कोणाला पाठीशी घालत आहे का, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.
'टीव्हीके' पक्षाचे आमदार अरुळ विघ्नेश यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश पाठवून गैरवर्तन केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. सुमारे तीन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. संबंधित आमदाराने मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन असभ्य वर्तन केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी विजय सरकारला धारेवर धरत आमदारावर कठोर कारवाईची मागणी केली होती. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती, तर १२ नोव्हेंबर रोजी द्रमुक आणि अण्णाद्रमुकने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र तक्रारी देत सखोल चौकशीची मागणी केली होती. दुसरीकडे, आमदार अरुळ विघ्नेश यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, राजकीय सूडबुद्धीतून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संबधित आमदाराने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले अश्लील संदेश आणि गैरवर्तनाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायमूर्ती लक्ष्मीनारायणन यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने समिती नेमण्याचे आदेश दिले. "तुम्ही कोणाला तरी वाचवत आहात, असा मला थोडा जरी संशय आला, तर... मला तुम्हाला अडचणीत आणायचे नाही," अशा शब्दांत न्यायमूर्तींनी राज्य सरकारला तंबी दिली. तसेच सरकारच्या भूमिकेवर न्यायालय बारीक लक्ष ठेवून असल्याचेही स्पष्ट केले.
प्रकरण ३१ जुलै रोजीच निदर्शनास आणून दिले असताना ठोस कारवाई का झाली नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली. "३१ जुलै रोजी ही बाब तुमच्या लक्षात आणून दिली गेली, तेव्हा तुम्ही काय पावले उचलली?" असा सवाल करत विलंबाबाबत स्पष्टीकरण मागितले. सुनावणीदरम्यान, सरकारी वकील आर. जॉन सथ्यान यांनी लेखी निवेदन सादर करत या तक्रारीप्रकरणी मंगळवारीच गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, न्यायालयाचे या उत्तराने समाधान झाले नाही. "या आक्षेपार्ह संदेशांची वेळीच दखल का घेतली गेली नाही? तुम्ही यावर काय केले? प्रत्येक गोष्ट तुम्हाला न्यायालयानेच सांगावी का? तुम्ही स्वतःहून कारवाई का करू शकत नाही?" अशा शब्दांत न्यायमूर्ती लक्ष्मीनारायणन यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
Madras High Court, Tamil Nadu government, Joseph Vijay, Kallakurichi Collector, Arul Vignesh, TVK MLA, Justice Lakshminarayanan, cybercrime, sexual harassment probe, Kanimozhi
सरकारने तक्रारदार महिला अधिकाऱ्याशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलली आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. "ती राज्याची मुख्य सचिव असो किंवा एखादी सफाई कामगार, तिला लैंगिक छळापासून संरक्षण मिळायलाच हवे. महिलेच्या वेदना आणि अडचणी समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतः महिला असण्याची गरज नाही," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत प्रशासनाने अशा तक्रारींबाबत संवेदनशील आणि तत्पर राहण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.
पीडित महिला अधिकाऱ्याची ओळख उघड करू नये, असे स्पष्ट निर्देश देऊनही त्यांची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. "मी स्पष्ट सांगितले होते की पीडितेची ओळख उघड होता कामा नये. मग ही माहिती सोशल मीडियावर कशी आली?" असा जाब न्यायमूर्तींनी विचारला.
यावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर सरकारचे नियंत्रण नसल्याने माहिती पसरण्यापासून रोखता आले नाही, असा बचाव तमिळनाडू सरकारने केला. मात्र, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. "फेसबुक आणि इन्स्टाग्राम राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली नसतील, पण सायबर क्राईम विभाग तर सरकारच्याच अखत्यारीत आहे ना? सायबर विभागाने यामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई करायला हवी होती," असे न्यायालयाने सुनावले. एकदा का ओळख उघड होऊन नुकसान झाले, की त्यानंतरच्या कारवाईला काय अर्थ उरतो, असा सवालह न्यायालयाने उपस्थित केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांचेही (SP) नाव नमूद केले असल्याची माहिती सुनावणीदरम्यान न्यायालयाला देण्यात आली. याची गंभीर दखल घेत, या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांपेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे संकेत न्यायालयाने दिले. "एसपींऐवजी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास करावा, अशी माझी इच्छा आहे," असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.