Pudhari
राष्ट्रीय

Madras HC restrains TVK MLA | एका मताने विजयी झालेल्या 'टीव्‍हीके'च्‍या आमदाराला विधानसभा कामकाजात सहभागी होण्यास मनाई

निवडणूक निकालास डीएमके नेत्‍याने दिले होते उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान

पुढारी वृत्तसेवा

Madras HC restrains TVK MLA

चेन्नई: मद्रास उच्च न्यायालयाने आज (दि. १२) तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे उमेदवार आर. श्रीनिवास सेतुपती यांना तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यापासून मनाई केली. तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या विजयाला द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) नेते के.आर. पेरियाकरुप्पन यांनी आव्हान दिले होते. न्यायालयाने दिलेल्‍या आदेशामुळे आमदार आर. श्रीनिवास सेतुपती सध्या बहुमत चाचणी किंवा विधानसभेच्या इतर कोणत्याही कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.

द्रमुकच्‍या पेरियाकरुप्पन यांचा झाला होता केवळ १ मताने पराभव

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचे पेरियाकरुप्पन यांचा सेतुपती यांच्याकडून केवळ एका मताने पराभव झाला होता. पेरियाकरुप्पन यांनी आपल्या याचिकेत असा आरोप केला की, एक पोस्टल बॅलट (टपाली मतदान) चुकीच्या मतदारसंघात पाठवल्यामुळे ते मोजले गेले नाही. मतमोजणी प्रक्रियेत इतरही अनेक अनियमितता आणि तफावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने कोणता आदेश दिला?

न्यायमूर्ती व्हिक्टोरिया गौरी आणि न्यायमूर्ती एन. सेंथिलकुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे मान्य केले. पुढील आदेश येईपर्यंत सेतुपती कोणत्याही बहुमत चाचणीत (Floor Test), विश्वासदर्शक ठराव, अविश्वास ठराव किंवा विधानसभेतील कोणत्याही मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत, असे निर्देश खंडपीठाने दिले आहे.

निवडणूक रद्द नाही

न्यायालयाने स्पष्ट केले की, या आदेशाचा अर्थ सेतुपती यांची निवडणूक रद्द केली असा होत नाही. तसेच, यामुळे पेरियाकरुप्पन यांना विजयी घोषित करण्याचा कोणताही हक्क मिळत नाही, असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले आहे.

सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे निर्देश

उच्‍च न्‍यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना ४ मे २०२६ रोजी तिरुपत्तूर मतदारसंघात (क्र. १८५) झालेल्या मतमोजणीचे सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ईव्हीएम (EVM) मतांचे रेकॉर्ड आणि पोस्टल बॅलट, बाद करण्यात आलेली टपाली मते आणि त्यांची पाकिटे, मतमोजणीच्या वेळी करण्यात आलेले व्हिडिओ चित्रीकरण.दुसऱ्या तिरुपत्तूर मतदारसंघात (क्र. ५०) चुकून गेलेले पोस्टल बॅलट सीलबंद करून वेगळे ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

काय होते पेरियाकरुप्पन यांचे दावे?

पेरियाकरुप्पन यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत शिवगंगा जिल्ह्यातील तिरुपत्तूर (क्र. १८५) मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी दावा केला होता की, ईव्हीएममधील मते आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारी यात १८ मतांची तफावत आहे. त्यांच्या मतदारसंघातील एक टपाली मत चुकून तिरुपत्तूर जिल्ह्यातील दुसऱ्या तिरुपत्तूर मतदारसंघात (क्र. ५०) गेले. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ते योग्य मतदारसंघात पाठवण्याऐवजी 'अवैध' ठरवून बाद केले.

टीव्‍हीकेचे संख्‍याबळ आले ११९ वर

या आदेशामुळे २३४ सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत टीव्हीके प्रणित आघाडीचे संख्याबळ आता १२० वरून ११९ वर आले आहे. या आघाडीकडे बहुमतापेक्षा एक आमदार अधिक आहे. आता उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार टीव्हीके आमदाराला विधानसभा प्रक्रियेपासून दूर राहावे लागणार आहे, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT