Lucknow Petrol Pump Employee Dragged Video Pudhari
राष्ट्रीय

Petrol Pump: ४ हजारांचं पेट्रोल भरलं अन् पैसे न देताच पळाले! कर्मचाऱ्याला कारसोबत ५०० मीटर फरफटत नेलं; धक्कादायक Video समोर

Lucknow Petrol Pump Employee Dragged: पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या अटकेसाठी तीन पथके तयार केली आहेत.

Rahul Shelke

Lucknow Petrol Pump Employee Dragged: पेट्रोल भरल्यानंतर पैसे न देताच पळून जाणाऱ्या कारचालकाला रोखण्याचा प्रयत्न एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील गोसाईगंज परिसरात ही धक्कादायक घटना घडली. कारचालकाने कर्मचाऱ्याला कारसोबत तब्बल ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजून २० मिनिटांनी एक कार गोसाईगंज परिसरातील पेट्रोल पंपावर आली. कारमधील व्यक्तींनी कर्मचाऱ्याला ४ हजार रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे कारमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी तो कारच्या खिडकीजवळ गेला.

मात्र, पैसे देण्याऐवजी कारचालकाने अचानक कारचा वेग वाढवला. कारचालक पळून जात असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने कारच्या खिडकीतून आत हात घालून दरवाजा पकडला. त्यानंतर कारमधील व्यक्तींनी कारचा वेग आणखी वाढवला.

५०० मीटरपर्यंत कर्मचाऱ्याला फरफटत नेले

कारचा वेग वाढत असतानाही कर्मचाऱ्याने कार सोडली नाही. मात्र, कारचालकाने त्याची पर्वा न करता गाडी पुढे नेली. त्यामुळे कर्मचारी कारसोबत रस्त्यावर फरफटत गेला. सुमारे ५०० मीटरपर्यंत त्याला फरफटत नेल्यानंतर आरोपींनी त्याला रस्त्याच्या कडेला सोडून दिले आणि तेथून पळ काढला.

या घटनेत कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा नव्हे, तर पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पेट्रोल पंप व्यवस्थापकाची पोलिसांत तक्रार

पेट्रोल पंपावर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

लखनऊ दक्षिणचे पोलीस उपायुक्त मोहम्मद मुश्ताक यांनी दिलेल्या माहितीनुसार, CCTV फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. आरोपींविरोधात संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT