Saurav Das Look Out Notice: कॉक्रोज जनता पार्टीचा समन्वयक सौरभ दासच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारने गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयात माहिती दिली की त्याच्याविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या पासपोर्टमधील माहितीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तत्पवूर्वी सौरभ दासला परदेशात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. दासच्या मते त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठात स्टुडंट युनियनच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र सरकारने त्याच्या या परदेश वारीवर बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने गुरूवारी सांगितलं की सौरभ दासविरूद्ध नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यावेळी सीजेपी नेता दासच्या वकिलांनी त्यांना या लुक आऊट नोटीसबाबत कोणतीही माहिती नाही असं सांगितलं. न्यायालयाने सरकारकडून दासच्या याचिकेवर उत्तर मागितलं आहे. सरकारकडून अॅडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया चेतन शर्मा हजर झाले होते. त्यांनी दासच्या पासपोर्टमध्ये विसंगती असल्याने त्याच्या भारतीय नागरिकत्वावर देखील प्रभाव पडू शकतो असं सांगितलं.
बुधावारी दासला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. त्याच्या पासपोर्टमध्ये जन्मस्थानाबाबतच्या माहितीत विसंगती आढून आल्याचा दावा सरकारने केला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर झायसवाल यांनी, 'मी सांगू इच्छितो की पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदारने योग्य माहिती देत असल्याचं जाहीर करावं लागतं. जर कोणत्या देखील टप्प्यावर माहितीत विसंगती आढळली तर अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती दिली जाते. ही गोष्ट सत्य लपवण्याच्या श्रेणीत येते. त्यामुळे आम्ही अर्जदारांना आपली बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी करतो.' असं सांगितलं होतं.
सौरभ दासला विमानतळावर अडवण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्याने या परदेश प्रवासापूर्वीच त्याला इमिग्रेशन काऊंटरवर थांबवण्यात आलं. त्याला तिथे कळालं की त्याच्या पासपोर्टबाबत नोटीस जारी झाली आहे. त्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेने सौरभ दासने यापूर्वी देखील परदेशात प्रवास केला असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याच्या पासपोर्टबाबत कोणता प्रश्न उपस्थित झाला नव्हता असं देखील दिपकेने सांगितलं.