Contempt of Court :
गुजरात उच्च न्यायालय: गुजरात उच्च न्यायालयाने एका ज्येष्ठ वकिलाविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान हे वकील चक्क बिअर पित फोनवर बोलताना आढळून आले. या धक्कादायक प्रकारानंतर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. ही शिस्तभंगाची घटना न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्या न्यायालयात घडली. यावेळी हे ज्येष्ठ वकील व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणीसाठी हजर झाले होते.
ज्येष्ठ वकिलाचे हे वर्तन अत्यंत अपमानजनक आणि धक्कादायक होते," असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती ए. एस. सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर. टी. वच्छानी यांच्या खंडपीठाने रजिस्ट्रीला ज्येष्ठ वकिलाविरुद्ध अवमानाची कारवाई दाखल करण्याचे निर्देश दिले.
न्यायमूर्ती ए. एस. सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर. टी. वच्छानी यांच्या खंडपीठाने म्हटले की, "या सुनावणीच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर झाली आहे. या अशोभनीय कृत्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. या घटनेकडे दुर्लक्ष करणे हे कायद्याच्या राज्यासाठी विनाशकारी ठरेल. संस्थेचा दर्जा खालावेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. ज्येष्ठ वकिलांकडे तरुण वकील एक आदर्श म्हणून पाहतात, याचे स्मरणही न्यायालयाने करुन दिले आहे.
ज्येष्ठ वकिलाने 'गुजरात उच्च न्यायालय नियम, २०२१' च्या नियम ५(J) चे उल्लंघन केले आहे. या नियमानुसार, सुनावणीत सहभागी होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, मग ती व्यक्ती प्रत्यक्ष असो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, न्यायालयाची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्यासाठी शिस्त आणि शिष्टाचार पाळणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने रजिस्ट्रीला निर्देश देताना म्हटले, " या घटनेचा अहवाल तयार करून पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयासमोर सादर करावा. या घटनेचा व्हिडिओ सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही रजिस्ट्रीला देण्यात आले आहेत. अवमानाची कारवाई नोंदवल्यानंतर, रजिस्ट्रीने संबंधित ज्येष्ठ वकिलास नोटीस बजावावी." दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.