Lamborghini accident case
कानपूर : येथील बहुचर्चित लॅम्बोर्गिनी कार अपघात प्रकरणात पोलिसांनी अखेर तंबाखू सम्राट चा मुलगा शिवम मिश्रा (वय २६) याला चार दिवसानंतर अटक केली आहे. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले होते. यापूर्वी, तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत स्थानिक पोलीस निरीक्षकावर (SHO) निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
रविवार, ८ फेब्रुवारी रोजी कानपूरमधील 'रिंगवाला चौराहा' येथे 'लॅम्बोर्गिनी रेव्ह्युल्टो' कारने एका रिक्षाला आणि उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार फुटपाथवरील पादचाऱ्यांनाही धडकली. या अपघातात रिक्षाचालक तौसीफ अहमद आणि विशाल व सोनू त्रिपाठी हे दोन दुचाकीस्वार जखमी झाले. अहमद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला 'अज्ञात चालका'विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, सखोल तपासानंतर शिवम मिश्राच कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी माहिती दिली की, अपघाताच्या वेळी शिवम स्वतः कार चालवत होता. अपघातानंतर त्याच्या मागे दुसऱ्या गाडीत असलेल्या खाजगी सुरक्षारक्षकांनी (बाऊन्सर्सनी) कारची काच फोडून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या शिवमला बाहेर काढले. स्थानिकांनी आरोप केला आहे की, सुरक्षारक्षक त्याला घटनास्थळावरून पळवून नेण्याचा प्रयत्न करत होते, यावरुन गोंधळही झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्येही सुरक्षारक्षक शिवम मिश्राला ड्रायव्हर सीटवरून बाहेर काढताना दिसत आहेत.
शिवम दारूच्या नशेत होता का, याची तपासणी फॉरेन्सिक अहवालाद्वारे केली जाणार आहे. दरम्यान, मिश्रा कुटुंबाने असा दावा केला आहे की, शिवमला गाडी चालवताना फिट आल्यामुळे हा अपघात झाला. गेल्या सहा महिन्यांपासून त्याला हा त्रास होत असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. मात्र, शिवमच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की, गाडी शिवम नाही तर चालक चालवत होता.
या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि शिवम मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ग्वाल्टोली पोलीस ठाण्याचे एसएचओ संतोष गौर यांना निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालात शिवम गाडी चालवण्यासाठी फिट नव्हता असे आढळले, तर परिवहन विभागाच्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मिश्रा कुटुंब यापूर्वी मार्च २०२४ मध्ये आयकर विभागाच्या धाडींमुळे चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून अनेक आलिशान गाड्या आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली होती. आता या ताज्या अपघातामुळे हे कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.