

Lamborghini Viral Video Mumbai
मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका लॅम्बोर्गिनी कारचा वेग २५० किमी प्रतितास पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले होते. या व्हिडिओची दखल घेत वरळी पोलिसांनी ही लॅम्बोर्गिनी कार ताब्यात घेतली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही लॅम्बोर्गिनी वांद्रे-वरळी सी-लिंकवर इतर वाहनांना मागे टाकत प्रचंड वेगाने धावताना दिसत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे गाडीची ओळख पटवण्यात आली. ही लॅम्बोर्गिनी वांद्रे-वरळी सी-लिंकवर चालवली जात होती. तिथे वेगाची मर्यादा ताशी ८० किमी इतकी आहे. सध्या पोलीस कार मालक आणि कार डीलरच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात यमुना द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जिवंत जळाले. त्यांचा जागीच कोळसा झाला. अपघातात शंभरावर प्रवासी जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने सात बसेस आणि तीन कार एकमेकांवर आदळल्या. ही धडक इतकी भीषण होती की, यातील वाहनांनी पेट घेतला. आग आणि धुराने लपेटल्यामुळे बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र आग झपाट्याने वाढत गेली.