Who is Rameez Khan:
राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरात जणू यादवी माजल्यासारख्या घटना काही दिवसांपासून घडत आहेत. नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधननं सपाटून मार खाल्ला. त्यांना ५० जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. त्यानंतर आरजेडीचे सर्वेसर्वा असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठी उलथापालथ होत आहे.
लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्यनं सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट करत राजकीय वातावरण ढवळून काढलं. रोहिणी यांनी मी माझ्या कुटुंबियांसोबतचे सर्व संबंध तोडत असल्याचं सांगितलं. त्यांनी बाहेरच्या व्यक्ती चुकीची माहिती सांगून कुटुंब उद्ध्वस्त करत आहेत असा आरोप केला. त्यानंतर ही बाहेरची व्यक्ती कोण अशी चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली. त्यानंतर एक नाव सतत प्रकाश झोतात येत आहे. ते म्हणजे रमीझ नेमत खान!
लालू प्रसाद यादव यांच्या घरातील यादवीला हा ३९ वर्षाचा माजी क्रिकेटपटू रमीझ खानच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. रोहिणी यांनी घर उद्ध्वस्त करणाऱ्या बाहेरच्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही रमीझ असल्याचं सांगितलं. हा रमीझ खान मुळचा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा आहे. रोहिणी यांना दावा केल्याप्रमाणं बाहेरचा दुसरा व्यक्ती राज्य सभा खासदार संजय सिंह आहेत. त्यांना तेजस्वी यादवांचा राजकीय सल्लागार म्हणून ओळखलं जातं.
रमीझ हा बलरामपूरचे राजकीय नेते रिझवान जहीर यांचा जावई देखील आहे. रिझवान जहीर यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांना हत्या प्रकरणात जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. तेजस्वी यादव यांचे जवळचे म्हणून ओळख असलेल्या रमीझ आणि त्यांची पत्नी झेबा रिझवान यांना २०२२ मध्ये खुनाच्या आरोपाखाली अटक देखील झाली होती. मात्र त्यांची जामीनावर सुटका झाली.
मात्र २०२४ मध्ये पुन्हा त्यांना जेलची वारी करावी लागली. यावेळी त्यांना गँगस्टर अॅक्टखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना एप्रिल महिन्यात जामीन मिळाला. जेलमधून बाहेर आल्यानंतर रमीझनं बिहार निवडणुकीत आपला मित्र तेजस्वी यांची मदत करण्यास सुरूवात केली.
रमीझ खान आणि तेजस्वी यांची ओळख ही क्रिकेटमुळं झाली. दोन्ही नेते हे दिल्ली आणि झारखंडकडून विविध वयोगटात एकत्र क्रिकेट खेळले. रमीझ हा २००८ - ०९ मध्ये २२ वर्षाखालील झारखंड संघाचा कर्णधार देखील राहिला आहे. क्रिकेटमधील ही मैत्री नंतर रमीझला राजकारणात घेऊन आली. त्यानं २०१६ मध्ये आरजेडीमध्ये प्रवेश केला.
आरजेडीमधील जाणकारांच्या मते जहीरनं अत्यंत शांतते अनेक मोठ्या जबाबदाऱ्या हातात घेतल्या. त्यात तेजस्वी यादवचे वैयक्तिक सोशल मीडिया हातळणं, कॅम्पेन टीम निवडणं या महत्वाच्या कामांचा समावेश होता.
बलरामपूरमधील तुलसीपूरमध्ये १९८६ साली जन्मलेल्या रमीझनं शिक्षणासाठी दिल्ली गाठलं. त्यानं जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून बीए आणि एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. तिथं त्याचे वडील प्रोफेसर होते. तेजस्वी देखील मथुरा रोडवरील डीपीएस कॉलेजचा विद्यार्थी आहे.
मात्र रमीझची राजकीय कारकीर्द ही ज्यावेळी त्याचं लग्न झेबा सोबत झालं तेव्हापासून सुरू झाली. झेबा ही बलरामपूरचे दोन वेळचे खासदार राहिलेल्या रिझवान जहीर यांची कन्या आहे. मात्र रमीझची राजकीय कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. २०२१ मध्ये पंचायत निवडणुकीवेळी रमीझवर काँग्रेस कार्यकर्ता दीपंकर सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर याच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला.
त्यानंतर पुढच्या वर्षी रमीझ त्याची पत्नी, सासरे आणि इतर तीन जणांना फिरोज पप्पू याच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. फिरोज पप्पू हे तुलसीपूरचे माजी नगर पंचायत अध्यक्ष होते. त्यानंतर रमीझ एकदा २०२३ मध्ये खूनच्या आरोपात अडकला. त्यावर प्रतापगडमधील काँट्रॅक्टर शकील खान यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात ४.७५ कोटी रूपयांची जमीन उत्तर प्रदेश सरकारनं जप्त केली होती.
एवढंच नाही तर २०२१ आणि २०२२ मध्ये रमीझवर NSA च्या केसेस देखील दाखल झाल्या आहेत. मात्र नंतर बलरामपूर जिल्हा प्रशासनानं रमीझवरील एक NSA ची केस रद्द केली. याचबरोबर रमीझवर आठ इतर प्रकरणात देखील चार्जशीट दाखल झाल्या आहेत. त्यात दोन केस या खून, एक खुनाचा प्रयत्न, दोन गँगस्टर अॅक्टखाली, एक खंडणीच्या केसचा समावेश आहे.
त्याची पत्नी झेबावर तीन केस दाखल आहेत. त्यात खून, गँगस्टर अॅक्ट आणि एक फसवणुकीचा गुन्ह्याचा समावेश आहे. मात्र या जोडप्याला या सर्व केसमध्ये जामीन मिळाला आहे त्यामुळे ते जेलच्या बाहेर आहेत. मात्र सासरा रिझवान जहीर हे मात्र सध्या ललितपूर जेलमध्ये आहेत.
कधीकाळी रिझवान झहीर यांच्यावर सीमेवरून अवैध व्यापार केल्याचे गुन्हे देखील दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी समाजवादी पक्षाकडून दोनवेळा खासदारकी भूषवली आहे. त्यानंतर त्यांनी तुलसीपूरमधून विधनसाभा देखील लढवली.